आयपीएल 2024 (IPL 2024) दरम्यान बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहे. सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ समाप्त होणार आहे. द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग, केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर, लखनौ सुपर जायंट्सचा हेड कोच जस्टीन लँगर यांची नावं सध्या चर्चेत आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन आणि दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) देखील बीसीसीआयनं कोच होण्याबाबत विचारणा केली होती. बीसीसीआयच्या या ऑफरला पॉन्टिंगनं उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयसीसीशी बोलतना पॉन्टिंगनं सांगितलं की, 'मी याबाबत अनेक रिपोर्ट पाहिले आहेत. साधरणत: या गोष्टी तुम्हाला माहिती होण्यापूर्वीच सोशल मीडियावर येतात. आयपीएलच्या दरम्यान थोडी-बहुत चर्चा झाली होती. मी हे काम करणार की नाही हे समजून घेण्यासाठी ते समजून घ्यायचं होतं.' पॉन्टिंग पुढं म्हणाला की, 'मला एका राष्ट्रीय टीमचा कोच व्हायला आवडेल. पण, माझ्या आयुष्यात अन्य काही गोष्टी आहेत. मला सध्या घरी काही वेळ घालवायचा आहे. भारतीय टीमसोबत काम करताना तुम्ही आयपीएल टीम जॉईन करु शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याचबरोबर एका राष्ट्रीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाला वर्षातले 10 ते 11 महिने काम आहे. ते सध्या माझ्या लाईफ स्टाईलमध्ये बसत नाही.'
( नक्की वाचा : ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या दिग्गज खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचा कोच )
पॉन्टिंग गेल्या सहा सिझनपासून दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच आहे. यापूर्वी त्यानं मुंबई इंडियन्ससोबतही काम केलंय. तो या आयपीएलच्या दरम्यान कुटुंबासह भारतामध्ये होता. भारतीय टीमचा कोच होण्याची ऑफर स्विकारावी असं मुलानं सुचवलं होतं, असं त्यानं सांगितलं.
'मी माझ्या कुटुंबासाोबत गेली पाच आठवडे आयपीएलमध्ये होतो. ते दरवर्षी इथं येतात. मी माझा मुलगा फ्लेचरशी या विषयावर चर्चा केली. त्यावर 'बाबा तुम्ही ही ऑफर स्विकारा. आपल्याला पुढची काही वर्ष तिथं जायला आवडेल,' असं त्यानं सांगितलं. फ्लेचरला भारतामधील क्रिकेट संस्कृती खूप आवडते. पण, कदाचित हे माझ्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये बसत नाही,' असं पॉन्टिंगनं सांगितलं.