गेल्या काही वर्षात बुद्धीबळ या खेळामध्ये भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी होताना पहायला मिळते आहे. प्रज्ञानंद, विदीथ गुजराती यांच्यानंतर भारताचा 17 वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा डंका वाजवला आहे. Candidates Chess Tournament जिंकण्याचा बहुमान गुकेशने पटकावला आहे. ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेचं विजेतेपद जिंकत गुकेशने चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनला आव्हान दिलं आहे. वर्षाच्या अखेरीस दोघांमध्ये हा सामना खेळवला जाईल.
Candidates Chess Tournament चं महत्व काय आहे ?
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ जगतामध्ये या स्पर्धेला बरंच महत्व आहे. जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. भारताकडून विश्वनाथन आनंद याच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसरा खेळाडू ठरला आहे. Candidates स्पर्धेमध्ये गुकेशने ग्रँडमास्टर हिकारु नाकामुराविरोधातला अंतिम सामना अनिर्णित राखला. या स्पर्धेत गुकेश 14 पैकी 9 गुण मिळवण्यात यशस्वी ठरला. या जोरावर गुकेशला अंतिम विजेतेपद बहाल करण्यात आलं.
रशियन ग्रँडमास्टरचा विक्रम गुकेशने मोडला -
17 व्या वर्षी या स्पर्धेतं विजेतेपद जिंकत गुकेशने रशियन ग्रँडमास्टर कॅस्परोव्हचा तीन दशकं नावावर असलेला विक्रम मोडीत काढला. 1984 साली वयाच्या 22 व्या वर्षी कॅस्परोव्हने ही स्पर्धा जिंकली होती. दरम्यान या विजयानंतर गुकेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. "मला खूप आनंद झाला आहे. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोनिआचमधील रोमांचक सामना पाहत होतो. त्याचा मला अंतिम सामन्यात फायदा झाला." गुकेशने केलेल्या या ऐतिहासीक कामगिरीनंतर भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनेही त्याचं कौतुक केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world