आता पावसामुळे क्रिकेटचा सामना रद्द होणार नाही, BCCI करतंय खेळपट्टीत नवा प्रयोग

हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला क्रिकेट मैदानात बीसीसीआयने आर्टिफीशीअल पीचचा प्रयोग केला आहे. BCCI ने या प्रयोगाला मंजूरी दिली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
हायब्रिड पिचचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर HPCA चे अधिकारी (फोटो -HPCA)
मुंबई:

भारतीय क्रिकेटचा कारभार पाहणारी BCCI ही संस्था जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखून आहे. आतापर्यंत भारतात क्रिकेटच्या प्रगतीसाठी BCCI ने अनेक प्रयोग केले आहेत. आता खेळपट्टीच्या दृष्टीकोनातून BCCI ने आणखी एक नवीन प्रयोग केला आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये आतापर्यंत अनेकदा पिच हा मुद्दा कळीचा ठरलेला आपण पाहिला आहे. अगदी मागच्या वर्षी वन-डे वर्ल्डकपमध्ये फायनल मॅचचं पिचही वादाचा विषय ठरलं होतं. याव्यतिरीक्त अनेकदा पावसामुळे पिच खराब होऊन मॅच रद्द झाल्याच्या घटनाही आपण अनुभवल्या असतील. परंतु यापुढे अशा घटना होणार नाहीत.

हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला क्रिकेट मैदानात बीसीसीआयने आर्टिफीशीअल पीचचा प्रयोग केला आहे. BCCI ने या प्रयोगाला मंजूरी दिली आहे. नैसर्गिक गवत आणि आर्टिफीशीअल सिंथेटीक गवताचा वापर करुन एका मशिनच्या सहाय्याने हे हायब्रीड पीच तयार करण्यात आलं आहे. देशभरातील इतर मैदानांमध्येही या आर्टीफिशीअल ग्रासचा वापर BCCI करण्याच्या तयारीत आहे.

हायब्रीड पीच कसं तयार होतं?

आर्टिफीशीअल सिंथेटीक फायबर आणि नैसर्गिक गवताच्या मिश्रणातून हे पीच तयार होतं. परंतु दिसताना हे पीच नैसर्गिक गवतासारखंच दिसतं. धर्मशाळा येथे तयार करण्यात आलेल्या हायब्रीड पीचमध्ये फक्त 5 टक्के आर्टिफिशीअल फायबर वापरण्यात आलं आहे. मुख्य पीच सोबतच बाजूच्या 3-4 प्रॅक्टीस पीचही याच पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. आर्टिफीशीअल सिंथेटीक फायबरचा वापर कमी प्रमाणात केल्यास मैदानाचं नैसर्गिक सौंदर्य आणि क्षमता कायम राहते.

Advertisement

नैसर्गिक गवताच्या तुलतेन आर्टिफीशील गवत फायदेशीर -

हायब्रीड गवताचा वापर केल्यामुळे पीच हे अधिक टिकाऊ बनतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्टिफीशीअल गवत हे लगेच खराब होत नाही. अनेकदा द्विपक्षीय मालिकांमधले सामने हे एकाच ठिकाणी 1-2 दिवसांच्या अंतराने खेळवले जातात. अशा परिस्थितीत खेळपट्टी नव्याने तयार करणं हे जिकरीचं काम असतं. परंतु आर्टिफीशीअल ग्रासचा वापर झाल्यास हे पीच चांगल्या परिस्थितीत राहू शकतं.

अनेकदा पावसाचा व्यत्यय आल्यानंतर पीच खराब झाल्याचं आपण पाहिलं आहे. त्याचा परिणाम सामना रद्द होण्यापर्यंत होतो, ज्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतो. परंतु आर्टिफीशीअल ग्रासचा वापर करुन पीच तयार केल्यास प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार नाही. पाऊस पडल्यानंतर 10-15 मिनीटात पाणी शोषून घेण्याची क्षमता या आर्टिफीशीअल पिचमध्ये असते.

Advertisement

मैदानावर कसं लावलं जातं आर्टिफीशीअल पिच?

हायब्रीड पीच मैदानावर बसवण्यासाठी युनिवर्सल मशीन महत्वाची असते. २०१७ साली  SIS Grass नावाच्या कंपनीने हे मशीन तयार केलं. कंपनीच्या दाव्यानुसार हायब्रीड पीच तयार करण्याच्या प्रक्रीयेत कुठेही काँक्रीटचा वापर होत नाही. आर्टिफिशीअल गवताला मैदानात जमिनीच्या आत लावलं जातं. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना मैदान हे एकसारखंच दिसतं आणि त्यात फारसा फरक दिसून येत नाही.

आतापर्यंत फुटबॉल, रग्बी यासारख्या खेळांमध्ये आर्टिफीशीअल पिचचा वापर झाला आहे. क्रिकेटचा विचार करायला गेलं तर इंग्लंडमध्ये लॉर्ड्स आणि ओव्हलच्या मैदानावरच या आर्टिफिशीअल पिचचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे धर्मशाला मैदानातला हा प्रयोग भविष्यात यशस्वी होईल का हे पाहणं क्रिकेटप्रेमींसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article