IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आयपीएल 2025 चे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता भारत पाकिस्तान यांच्या शनिवारी शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर आयपीएल पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 चा अंतिम सामना कोलाकाता येथे होणार नाही, याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीसीसीसीआयने आयपीएलचे सामने पुन्हा सुरु करण्याबाबत रविवार चर्चा केली. बीसीसीआय आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांच्या वेळापत्रकावर काम करत आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याने आयपीएलचा अंतिम सामना आता 25 मे ऐवजी 30 मे रोजी मर्यादित ठिकाणी खेळवता येईल. आज रात्रीपर्यंत सर्व आयपीएल संघांना वेळापत्रक पाठवले जाईल."
( नक्की वाचा : Rohit Sharma : एक कॅप्टन... रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरच्या पोस्टची फॅन्समध्ये चर्चा )
बीसीसीआयने पंजाब किंग्ज वगळता सर्व संघांना मंगळवारपर्यंत आपापल्या ठिकाणी रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून शुक्रवारपर्यंत आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकेल. बीसीसीआयने फ्रँचायझींना त्यांच्या परदेशी खेळाडूंना त्यांच्या प्रवासाच्या योजनांबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने आयपीएल अधिकृतपणे स्थगित केल्यानंतर शुक्रवारी बहुतेक परदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांच्या घरी रवाना झाले. आता, फ्रँचायझी त्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करत आहेत.
डबल हेडरची योजना
आयपीएलच्या यंदाच्या सीजनचे12 सामने शिल्लक असताना, उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील. कारण प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी किमान 6 दिवस लागतात. आणि स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आता फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत हे लक्षात घेता, अधिक डबल हेडरची योजना आखली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरच्या ठिकाणात कोणताही बदल होणार नाही. हे सामने हैदराबादमध्ये होणार होते. परंतु कोलकाता 1 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याचे आयोजन करू शकत नाही. कारण त्या दिवशी शहरात पावसाचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- Qatar Vs UAE: W,W,W..., अख्खा संघ रिटायर्ड आऊट,17 फलंदाज शून्यावर बाद, क्रिकेटच्या मैदानात अजब घडलं!)
अंतिम सामना अहमदाबादमध्ये?
आयपीएल 2025 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होऊ शकतो. यापूर्वी अंतिम सामना 25 मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाणार होता. मात्र आता अंतिम सामना 30 मे किंवा 1 जून रोजी होईल आणि त्याचे ठिकाण अहमदाबाद असू शकते.