IPL 2026 Auction : आयपीएल 2026 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅटर जोश इंग्लिसवर पैशांचा पाऊस पडला. लखनौ सुपर जायंट्सने त्याला 8.6 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे .या मोठ्या बोलीमुळे आता जोश इंग्लिसने त्याचा लग्नानंतरचा प्लॅन बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधी तो लग्नामुळे केवळ 4 सामने खेळणार असल्याचं बोललं जात होतं, पण आता तो आपल्या हनिमूनचा प्लॅन पुढे ढकलून पूर्ण आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध राहण्याची दाट शक्यता आहे. त्याने घेतलेला हा यु-टर्न सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पंजाब किंग्जचा संताप आणि लिलावातील ड्रामा
जोश इंग्लिस आधी पंजाब किंग्सचा भाग होता. पंजाब त्याला रिटेन करणार होता, पण लिलावापूर्वी शेवटच्या क्षणी त्याने आपण केवळ तीन-चार सामन्यांसाठी उपलब्ध असू असं सांगितलं. पंजाबचे मालक नेस वाडिया यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.
वाडिया यांनी सांगितलं की, जोशने रिटेन्शनच्या डेडलाईनच्या केवळ 45 मिनिटे आधी ही माहिती दिली, जे अत्यंत प्रोफेशनल वागणं नव्हतं. त्यामुळेच पंजाबने त्याला रिलिज केलं. पण लिलावात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. लखनौ आणि हैदराबाद या दोन्ही टीम्सनी त्याच्यावर मोठी बोली लावली, कारण त्यांना तो जास्त सामन्यांसाठी उपलब्ध असेल याची कुणकुण लागली होती.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction : यूपीच्या पोराने आयपीएल लिलावात केला राडा; चेन्नईला मिळाला नवा 'सर जडेजा' )
हनिमून कॅन्सल करून मैदानात उतरणार
जोश इंग्लिस 18 एप्रिल रोजी लग्न करणार आहे. सुरुवातीला त्याने लग्नानंतर हनिमूनला जाण्याचं ठरवलं होतं, पण आता 8.6 कोटी रुपये मिळाल्यानंतर तो आपली प्राथमिकता बदलू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, तो सीझनच्या सुरुवातीला भारतात येईल, त्यानंतर लग्नासाठी काही दिवस सुट्टी घेऊन मायदेशी जाईल आणि लग्न झाल्यावर लगेच पुन्हा लखनौच्या टीमला जॉईन होईल.
लखनौचे प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि हैदराबादचे डॅनियल व्हिटोरी यांना जोशच्या या बदलेल्या प्लॅनबद्दल आधीच कल्पना होती, म्हणूनच त्यांनी त्याच्यावर इतका मोठा जुगार खेळला.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction: डॉक्टरांनी म्हटलं होतं 12 वर्षेच जगणार, आज आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू )
हैदराबादच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा
सनरायझर्स हैदराबादचा बॉलिंग कोच वरुण ॲरॉन याने लिलावानंतर यावर भाष्य केलं आहे. त्याने सांगितलं की, डॅनियल व्हिटोरी आणि जोश यांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे तो जास्त सामने खेळेल अशी आशा आम्हाला होती. एकदा लिलाव झाला की लोक अनेकदा आपले निर्णय बदलतात, असंही वरुणने म्हटलंय. जोशला मिळालेली मोठी किंमत पाहता, आता तो लखनौसाठी मॅच विनर ठरू शकतो. पंजाबला हुलकावणी देऊन जोशने लखनौची वाट धरली असली, तरी त्याच्या या निर्णयामुळे पंजाबच्या कॅम्पमध्ये मात्र अजूनही नाराजीचं वातावरण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world