IPL 2026 Auction : आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये राजस्थानचा बॅटर विकेट किपर कार्तिक शर्मानं (Kartik Sharma) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कार्तिकला चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) तब्बल 14.20 कोटी रुपयांना खरेदी केलं. इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याचं कार्तिक काय करणार? हा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं त्यानं दिलेल्या उत्तरानं अनेक फॅन्सची मनं जिंकली आहेत.
काय करणार कार्तिक?
जतिन सप्रू यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने आपल्या भविष्यातील नियोजनाबद्दल खुलासा केला. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, आयपीएलच्या पहिल्या पगारातून तो आई-वडिलांसाठी काय करणार? तेव्हा त्याने अतिशय भावूक उत्तर दिले.
कार्तिक म्हणाला की, सर्वात आधी मी माझ्या वडिलांचे 26 लाख रुपयांचे कर्ज फेडणार आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूसाठी ही रक्कम आयुष्य बदलणारी असली, तरी त्याने आपल्या कुटुंबाच्या कष्टाची जाणीव ठेवत ही इच्छा व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction : यूपीच्या पोराने आयपीएल लिलावात केला राडा; चेन्नईला मिळाला नवा 'सर जडेजा' )
ऑक्शनमध्ये लागली मोठी बोली
कार्तिक शर्माने या ऑक्शनसाठी आपली बेस प्राईज फक्त 30 लाख रुपये ठेवली होती. मात्र, जेव्हा त्याचे नाव पुकारले गेले, तेव्हा अनेक संघांमध्ये जोरदार चढाओढ सुरु होती. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांसारख्या मोठ्या संघांनी त्याच्यावर बोली लावली. अखेर चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आणि 14.20 कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजून या हिऱ्याला आपल्या ताफ्यात घेतले.
कार्तिकची घरगुती क्रिकेटमधील कामगिरी
कार्तिकने आतापर्यंतच्या कारकिर्दीत आपल्या बॅटिंगने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने 8 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 43.54 च्या सरासरीने 479 रन केले असून त्यात 3 सेंच्युरींचा समावेश आहे.
लिस्ट ए क्रिकेटचा विचार केला तर 9 सामन्यात त्याने 55.62 च्या सरासरीने 445 रन चोपले आहेत, ज्यात 2 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरी आहेत. टी20 फॉरमॅटमध्येही त्याने 12 सामन्यात 30.36 च्या सरासरीने 334 रन करत आपली ताकद दाखवून दिली आहे. आता सीएसकेमध्ये अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world