IPL 2026 Auction Update : आयपीएल लिलावात जेव्हा एखाद्या खेळाडूवर कोट्यवधींची बोली लागते, तेव्हा संपूर्ण क्रिकेट विश्वाचे डोळे विस्फारतात. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीन याने तर इतिहास रचला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ग्रीनला तब्बल 25.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मात्र, ही सर्व रक्कम संबंधित खेळाडूच्या खिशात जाते का, हा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो. या रकमेतून टॅक्स आणि इतर कपाती कशा होतात, याचे सविस्तर गणित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
किती असतो एकूण पगार?
लिलावात जाहीर होणारी रक्कम ही खेळाडूची ग्रॉस सॅलरी म्हणजेच ठोक पगार असतो, ती कोणतीही बक्षीस रक्कम नसते. जर एखाद्या खेळाडूला 10 कोटी रुपयांना खरेदी केले असेल, तर ती त्या हंगामासाठीची त्याची एकूण सॅलरी ठरते. खेळाडू मैदानात सर्व सामने खेळो किंवा संपूर्ण हंगाम बेंचवर बसून राहो, करारातील अटींनुसार त्याला ठरलेली पूर्ण रक्कम दिली जाते. ही रक्कम फ्रेंचाइजीकडून खेळाडूंना टप्प्याटप्प्याने किंवा काही हप्त्यांमध्ये दिली जाते.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी )
इन हँड सॅलरी किती?
खेळाडूंना मिळणाऱ्या इन-हँड सॅलरीचा विचार केला तर भारतीय कर प्रणालीनुसार यावर मोठा इन्कम टॅक्स कापला जातो. आयपीएलमधून मिळणारी ही कमाई खेळाडूच्या वार्षिक उत्पन्नाचा भाग मानली जाते. कॅमेरुन ग्रीन सारख्या विदेशी खेळाडूंसाठी किंवा भारतीय स्टार खेळाडूंसाठी टॅक्सचा दर हा साधारणपणे 30 टक्क्यांच्या आसपास असतो. याशिवाय अनेक खेळाडू आपले स्वतःचे मॅनेजर आणि वैयक्तिक कर्मचारी नेमतात, ज्यांचा पगार देखील याच रकमेतून द्यावा लागतो.
उदाहरणादाखल पाहायचे झाले तर, समजा एखाद्या खेळाडूची ऑक्शन किंमत 2 कोटी रुपये आहे. ही त्याची ग्रॉस सॅलरी झाली. यावर 30 टक्क्यांहून अधिक टॅक्स आणि इतर वैयक्तिक खर्च वजा केल्यास, त्या खेळाडूच्या हातात प्रत्यक्षपणे 1.3 कोटी ते 1.4 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम येते. म्हणजेच लिलावात दिसणारा आकडा आणि प्रत्यक्षात हातात येणारी रक्कम यात मोठी तफावत असते.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 : CSK ला नमवून Cameron Green ला घेतलं, पण KKR फसली, जाणून घ्या का कापले जाणार ग्रीनचे पैसे? )
दुखापतग्रस्त खेळाडूंना किती रक्कम मिळते?
एखादा खेळाडू संपूर्ण हंगाम दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे खेळू शकला नाही, तर त्याचे मानधन करारातील अटींवर अवलंबून असते. अनेकदा विमा कंपन्या किंवा फ्रेंचाइजी विशिष्ट अटींनुसार पूर्ण किंवा काही प्रमाणात रक्कम देतात. तसेच लिलावात न जाता जेव्हा एखाद्या खेळाडूला रिटेन केले जाते, तेव्हा फ्रेंचाइजी आणि खेळाडू यांच्यात सॅलरी निश्चित केली जाते. या रिटेंशन रकमेवरही कर आकारणीचे सर्व नियम लागू होतात.
अन्य कमाई किती असते?
खरे तर ऑक्शनमध्ये मिळणारी ही रक्कम खेळाडूंच्या उत्पन्नाचा केवळ एक भाग असते. या मूळ उत्पन्नाशिवाय खेळाडू सामनावीर पुरस्कार, मालिकावीर पुरस्कार आणि विविध प्रायोजकत्व तसेच जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधींची अतिरिक्त कमाई करत असतात. त्यामुळे आयपीएल लिलावातील आकडा ही त्यांच्या कमाईची केवळ एक सुरुवात असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world