जाहिरात

MCA Election : मुंबई क्रिकेटमध्ये 'शांतीत क्रांती'; अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध, पडद्यामागे काय घडलं?

MCA Election: भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई क्रिकेटचा कारभार करणाऱ्यामुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association - MCA) चा भावी अध्यक्ष निश्चित झाला आहे.

MCA Election : मुंबई क्रिकेटमध्ये 'शांतीत क्रांती'; अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध, पडद्यामागे काय घडलं?
MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
मुंबई:

MCA Election: भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई क्रिकेटचा कारभार करणाऱ्यामुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association - MCA) चा भावी अध्यक्ष निश्चित झाला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पडद्यामागे वेगाने हालचाली झाल्या आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपले अर्ज मागे घेतले. या नाट्यमय घडामोडींमुळे MCA च्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे.

अजिंक्य नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसाच्या अखेरीस, MCA चे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हेच पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर अर्जदारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली असली तरी, इतर महत्त्वाच्या पदांसाठीची निवडणूक बाकी आहे आणि या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. MCA च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी येत्या 12 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, पण त्याआधीच अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली आहे.

पडद्यामागील घडामोडी अन् दिग्गजांची माघार

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पडद्यामागे जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीदेखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतला. त्यांच्यासह डायना एडल्जी (Diana Edulji) आणि विहंग सरनाईक यांनीसुद्धा आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या सर्वांच्या माघारीनंतर अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती, पण अखेर सर्वांच्या सहमतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

( नक्की वाचा : IPL 2026 आधी CSK मध्ये सर्वात मोठा भूकंप? संजू सॅमसनसाठी 'या' बड्या खेळाडूला देणार सोडचिठ्ठी? )
 

 'या' तीन बड्या नेत्यांच्या रणनीतीमुळे तिढा सुटला

MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी काल रात्रीपासूनच पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरू होत्या. हा तिढा सुटावा यासाठी तीन बडे नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते आणि याबाबत विचारविनिमय करत होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांचा समावेश होता. या तीनही नेत्यांनी चर्चा करून अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या नेत्यांनी आखलेल्या रणनीतीमुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, इतर पदांसाठी येत्या 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी भरले होते अर्ज?

या निवडणुकीत अनेक प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केल्यामुळे सुरुवातीला मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. त्यामध्ये माजी क्रिकेटपटू डायना एडल्जी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता.

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार अशा 5 महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज सादर केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार पदांसाठी आपला अर्ज भरला होता. विहंग सरनाईक यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सहसचिवपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती.

या सर्व दिग्गज उमेदवारांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, अध्यक्षपदाचा तिढा सुटल्यामुळे आता इतर पदांवर कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com