भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याला आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदावरून हटवले जाण्याच्या चर्चांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच सूर्यकुमारच्या कप्तानीखाली भारताने अहमदाबाद येथे न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराला संघातून किंवा कर्णधारपदावरून हटवण्याची ही कदाचित पहिलीच वेळ ठरेल. आता आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्य निवड समितीच्या नजरेत असलेल्या 5 प्रमुख दावेदारांवर आणि त्यात कोण सर्वात पुढे आहे, यावर एक नजर टाकुया.
तिलक वर्मा
जरी इतर वरिष्ठ खेळाडू शर्यतीत असले, तरी बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनुसार 24 वर्षीय तिलक वर्मा सध्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. बीसीसीआय तिलकला तिन्ही फॉरमॅटचा भविष्यातील नियमित खेळाडू म्हणून पाहत आहे. त्याचे वय आणि फॉर्म त्याच्या बाजूने आहे.
नुकतीच श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या 'भारत अ' संघाचे कर्णधारपद तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे. 2024 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने सलग दोन शतके झळकावली होती. 2025 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने 14 सामन्यांत 460 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या आणि यंदाच्या हंगामात 152 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. सूर्यकुमार यादवप्रमाणेच तो चौथ्या क्रमांकावर खेळणारा सर्वोत्तम फिनिशर आणि संकटमोचक मानला जातो.
(नक्की वाचा- Jeans Small Pocket: जीन्सला उजव्या बाजूला 'तो' छोटा खिसा का असतो? जाणून घ्या रंजक माहिती)
श्रेयस अय्यर
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा सूर्यकुमार यादवची जागा घेण्यासाठी सर्वात नैसर्गिक दावेदार आहे. गेल्या दोन वर्षांत अय्यरने टी-20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी पंजाब किंग्ससाठी 17 सामन्यांत 50.33 च्या सरासरीने 604 धावा करणाऱ्या अय्यरने यंदाच्या हंगामात 14 सामन्यांत 55.33 ची सरासरी आणि 168.81 च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने 498 धावा केल्या. ज्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमारच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो अगदी चपखल पर्याय आहे.
संजू सॅमसन
संजू सॅमसनने यंदाच्या टी-20 विश्वचषकात केलेली कामगिरी इतिहास विसरू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सचे अनेक वर्षे नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव संजूकडे आहे. एक यष्टिरक्षक-सलामीवीर आणि कर्णधार म्हणून तो अंतिम 11 खेळाडूंच्या संघात अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवण्याचे उत्तम स्वातंत्र्य व्यवस्थापनाला मिळवून देतो. विश्वचषकानंतर आयपीएलमध्येही त्याने आपली अप्रतिम फॉर्म कायम ठेवला.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
इशान किशन
टी-20 विश्वचषकापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार प्रदर्शन करून इशानने संघात पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी इशान किशनच्या नेतृत्वाता झारखंडने देशातील सर्वात मोठी स्पर्धा 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी' जिंकली होती. तर यंदा त्याला सुरुवातीच्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादचे (SRH) नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली.
जसप्रीत बुमराह
या यादीत पाचव्या क्रमांकावर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. बुमराहकडे कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याचा, तसेच दोन टी-20 सामन्यांचा अनुभव आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत त्याने 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. मात्र, बुमराहच्या दुखापती आणि त्याचा वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता, त्याला नियमित कर्णधार करणे निवड समितीसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world