Shubman Gill : आगामी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारे फलंदाज शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कायम ठेवण्याकडे निवड समितीचा कल असल्याची चर्चा आहे.
नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिल याने शानदार कामगिरी केली. केवळ 25 वर्षांच्या गिलने कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि 2-2 अशा बरोबरीत राहिलेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने या मालिकेत 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या, ज्यात 4 शतके आणि 1 द्विशतकाचा (269) समावेश आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला जुलै महिन्याचा आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारही मिळाला.
(नक्की वाचा- WCL 2025 : भारतानं पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार का घातला? एका खेळाडूमुळे घेतला मोठा निर्णय)
या वर्षात गिलने आतापर्यंत एकूण 14 सामन्यांच्या 20 डावांत 64.94 च्या सरासरीने 1234 धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडचा बेन डकेट 1290 धावांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वालनेही इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्याने 384 धावा काढल्या, ज्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )
मधल्या फळीत अनुभवी फलंदाजांची गरज?
रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन UAE च्या संथ खेळपट्ट्यांवर अधिक चांगली कामगिरी करू शकणाऱ्या अनुभवी मधल्या फळीतील फलंदाजांचा शोध घेत आहे. यामुळे, श्रेयस अय्यर आणि जितेश शर्मा यांना टी-20 संघात स्थान मिळू शकते. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 13 सामने जिंकले आहेत, त्यामुळे संघाला आपल्या विजयी कॉम्बिनेशनला धक्का द्यायचा नाही, असे दिसून येते.