PR Sreejesh last match: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमनं (India Men's Hockey Team) ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. स्पेन विरुद्ध झालेल्या थरारक लढतील भारतानं 2-1 असा विजय मिळवला. या विजयासह ऑलिम्पिकमध्ये तब्बल 50 वर्षांनंतर भारतानं सलग दुसऱ्यांदा हॉकीमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या पहिल्या मॅचपासून शेवटच्या मिनिटापर्यंत गोलकिपर परटट्टू रवींद्रन श्रीजेशवर ( (PR Sreejesh) सर्वांचं लक्ष होतं. क्रिकेटमध्ये अनेक दशकं एक वॉल (राहुल द्रविड) जगभरातील दिग्गज बॉलर्ससमोर खंबीर उभी होती. हॉकी टर्फवर तेच काम पी.आर. श्रीजेशनं केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रीजेशनं 18 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गोलपोस्टसमोर अनेक वादळी आक्रमण यशस्वी परतवले. त्याचा बचाव भेदून गोल करणे अनेक दिग्गजांना जमलं नाही. यापूर्वी टोक्योमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं हॉकीमधील पदकाचा दुष्काळ संपवला. पॅरिसमध्येही त्यानं जगाला थक्क करणारा खेळ केला. भारतीय हॉकी टीमला पुढची अनेक वर्ष त्याची कमतरता जाणवणार आहे.
श्रीजेशच्या यशाची 3 रहस्यं
श्रीजेशला भारतीय हॉकीची वॉल म्हंटलं जातं. 3 खास वैशिष्ट्यांमुळे तो खंबीरपणे गोल्टपोस्टसमोर उभा राहू शकला. श्रीजेशच्या यशाचं पहिलं रहस्य आहे फोकस. मॅच पाहण्यासाठी कितीही गर्दी असू दे... मैदानावरील प्रचंड गोंधळातही श्रीजेशचा फोकस कधीही ढळला नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकग्रचित्तानं खेळ करणं हे श्रीजेशच्या यशाचं पहिलं रहस्य आहे.
श्रीजेशच्या यशाचं दुसरं रहस्य आहे त्याचा आत्मविश्वास. स्वत: श्रीजेशनंच एकदा याबाबत सांगितलं होतं. 'तुम्हाला गोलकिपर व्हायचं असेल तर तुम्ही थोडं वेगळं असणं आवश्यक आहे. तुमच्याकडं जन्मत:चं गुणवत्ता, निडर वृत्ती आणि मॅच जिंकल्यानंतर हेडलाईनमध्ये स्वत:चं नाव आलं नाही तरी ते स्वीकारण्याची वृत्ती हवी.'
( नक्की वाचा : Paris Olympics 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव )
हॉकी विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलकिपर पुढं म्हणाला, 'मी सुरुवातीला राज्य टीममध्ये खेळल्यानंतर ग्रेस मार्क्स मिळतील या उद्देशानं हॉकीकडं वळालो, त्यानंतर हॉकी खेळणं माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्ट असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी गोलकिपर होण्याचं ठरवलं. हा संपूर्ण माझा निर्णय होता. मी त्या निर्णयावर कायम राहिलो. माझा हा आत्मविश्वासच माझी सर्वात मोठी शक्ती ठरला.'
श्रीजेशच्या यशाचं तिसरं रहस्य आहे, त्याची निडर वृत्ती. गोलकिपरचं आयुष्य धोकादायक असतं. बॉल तुझ्याकडं येतो त्यावेळी तुला भीती वाटते का? हा प्रश्न श्रीजेशला विचारण्यात आला होता. त्यावेळी श्रीजेशनं सांगितलं की, 'कधी-कधी सरावाच्या दरम्यान कुणी जवळून शॉट लगावला तर मला भीती वाटते. तू मला जखमी करशील असं मी त्याच्यावर ओरडतो. पण, मॅच दरम्यान हा विचार माझ्या मनात कधीही येत नाही. कितीही वेगानं बॉल आला तरी मला गोल वाचवायचा आहे, ही एकच गोष्ट माझ्या डोक्यात सुरु असते.' ही निर्भय वृत्तीच श्रीजेशच्या यशाचं तिसरं रहस्य होतं.
𝐓𝐡𝐞 𝐦𝐚𝐧, 𝐭𝐡𝐞 𝐥𝐞𝐠𝐞𝐧𝐝, 𝐒𝐫𝐞𝐞𝐣𝐞𝐬𝐡 𝐥𝐞𝐚𝐯𝐢𝐧𝐠 𝐭𝐡𝐞 𝐠𝐚𝐦𝐞 𝐨𝐧 𝐚 𝐇𝐈𝐆𝐇 ⚡️⚡️⚡️
— India_AllSports (@India_AllSports) August 8, 2024
Tears in the eyes as we type this... 🥲 #Paris2024 #Hockey #Paris2024withIAS pic.twitter.com/fWNeU4CTzK
दुसरा भारतीय आणि पहिला गोलकिपर
श्रीजेशला 2021 मध्ये 'वर्ल्ड गेम्स अॅथलिट ऑफ द इयर' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार मिळवणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला गोलकिपर होता. यापूर्वी महिला टीमची कॅप्टन रानी रामपालला हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारासाठी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनकडून नामांकन मिळालेला श्रीजेश एकमेव खेळाडू होता
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world