भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्यासाठी टी20 विश्वचषक2026 हा खऱ्या अर्थाने स्वप्नवत ठरला आहे. इशान किशनच्या फॉर्ममुळे सुरुवातीला संघातून बाहेर राहावे लागल्यानंतर, संजूने वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावांची ऐतिहासिक खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेल्या संजूने मिळालेल्या संधीचे सोने केले. या खेळीनंतर रोहित शर्माने संजूला कठीण काळात दिलेली साथ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रोहित शर्मा आणि संजू यांच्यातील एक जुना संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
"दुखी नको होऊ..." रोहितचा तो शब्द!
विश्वचषकाच्या सुरुवातीला जेव्हा भारत अमेरिकेविरुद्ध (USA) वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना खेळणार होता, तेव्हा संजू सॅमसन संघात नव्हता. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, त्यावेळी रोहित शर्मा संजूच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला होता, "कसा आहेस? दुखी नको होऊ. खूप मोठी टूर्नामेंट आहे, कधीही संधी मिळू शकते."
रोहितचे हे शब्द संजूसाठी प्रेरणादायी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संजूला संघात स्थान मिळाले आणि त्याने आधी झिम्बाब्वेविरुद्ध छोटी पण प्रभावी खेळी केली आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावा कुटून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
VIDEO
Bahut hard bahut hard🔥🔥
— Brutal Truth (@sarkarstix) March 2, 2026
Rohit Sharma ❌️ Sanju Samson pic.twitter.com/do7bmxHe9B
विराट आणि रोहितकडून शिकलो!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या विश्वचषकातील यशस्वी 'रन चेस'चे नेतृत्व केल्यानंतर संजू सॅमसन भावुक झाला होता. त्याने आपल्या यशाचे श्रेय दिग्गज खेळाडूंना दिले. "मी 10-12 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे आणि 10 वर्षांपासून भारतीय संघासोबत आहे. मी नेहमी खेळत नसलो तरी डगआऊटमधून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना पाहून खूप काही शिकलो. ते मैदानावर काय करतात, दडपण कसे हाताळतात, हे पाहणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते," असे संजूने सांगितले.
(नक्की वाचा- T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)
संजू सॅमसनचा विश्वचषकातील प्रभाव
इशान किशनच्या शानदार फॉर्ममुळे संजूला सुरुवातीला संधी नाकारण्यात आली होती. मात्र, यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संजूने आता संघात आपले स्थान पक्के केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची ही खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील 'रन चेस'मधील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world