टी-20 वर्ल्ड कप 2024 पावसामुळे देखील लक्षात राहणार आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी देखील टी 20 वर्ल्ड कपच्या चुकीच्या शेड्युलिंगवर टीका केली आहे. आता शनिवारी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र अंतिम सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. जर अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे व्यत्यय आला तर काय?
पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि नाणेफेकीला उशीर झाला, तर अंतिम सामन्यात अतिरिक्त 190 मिनिटांची तरतूद करण्यात आली आहे. सामन्याचा निकाल मिळवण्यासाठी दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला दहा षटके अनिवार्यपणे फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे दहा षटकांपूर्वी सामन्याचा निकाल लागणार नाही, हे स्पष्ट आहे.
अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डेची व्यवस्था?
टी 20 वर्ल्ड कपसाठी 30 जून रिझर्व्ह डे असणार आहे. पावसामुळे सामना खोळंबला तर सामना 30 जून रोजी सामना 29 जून रोजी जिथे थांबला होता तिथून खेळवला जाणार आहे. रिझर्व्ह डेच्या दिवशी सामना झाला तर काही नियम त्यावेळी लागू केले जातील.
रिझर्व्ह डे कसं काम करतो? त्याचा कसा वापर होतो?
सामन्यात पावसामुळे बाधा निर्माण झाली तर 190 मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. सामन्याचा निकाल येण्यासाठी किमान 10 षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे. जर सामना 29 जून रोजी पूर्ण झाला नाही तर 30 जूनला सामना पुढे खेळवला जाईल. गरज असल्यासा षटके कमी करुन सामना खेळवला जाईल.
सामना पावसाने धुवून गेला तर काय?
पावसामुळे अंतिम सामन्याचा निकाल लागला नाही तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world