T20 WC शेवटच्या बॉलवर जिंकता-जिंकता हरलं नेपाळ, लहान मुलासारखा रडू लागला खेळाडू

T20 WC SA vs NEP : नवोदीत नेपाळची टीम बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अगदी जिंकता-जिंकता हरली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेला T20 वर्ल्ड कप हा धक्कादायक निकालांसाठी लक्षात राहणार आहे. हा वर्ल्ड कप तब्बल 20 देशांसह खेळण्याचा आयसीसीचा निर्णय चांगलाच यशस्वी झाला. अनेक लहान टीमनं या स्पर्धेत त्यांचा ठसा उमटवला आहे. अमेरिकेनं पाकिस्तानचा पराभव करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला. हा या वर्ल्ड कपमधील आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक निकाल आहे. अमेरिकेप्रमाणेच नेपाळला देखील एक ऐतिहासिक संधीच्या उंबरठ्यावर आलं होतं. पण, अगदी शेवटच्या बॉलवर त्यांची निराशा झाली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ हा शनिवारी झालेला सामना चांगलाच रंगतदार झाला. दक्षिण आफ्रिकेनं यापूर्वीचे तीन सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आफ्रिका नेपाळलाही सहज पराभूत करेल असा सर्वांचा अंदाज होता. पण, नेपाळनं त्यांना शेवटपर्यंत झुंजवलं.

भुर्तेलची 'कुशल' बॉलिंग

पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 115 रन्सच करता आले. नेपाळचा ऑल राऊंडर कुशल भुर्तेलच्या स्पिन बॉलिंगपुढे आफ्रिकेची ही अवस्था झाली. भुर्तेलनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 19 रन देत 4 विकेट्स घेतल्या. दिपेंद्र सिंहनं 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. 

( नक्की वाचा : T20 WC : भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त! )
 

नेपाळचा शेवटपर्यंत लढा

नेपाळनं 116 रन्सचा पाठलाग शेवटच्या बॉलपर्यंत निकारानं केला. आफ्रिकेच्या बलाढ्य बॉलिंगचा नेपाळच्या अनअनुभवी बॅटर्सनं जोरदार सामना केला. नेपाळकडून आसिफ शेखनं सर्वात जास्त 42 रन केले. अनिल शहानं 27 रन करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी खेळत असताना नेपाळ इतिहास रचेल असं वाटत होतं. पण, दक्षिण आफ्रिकेनं निर्णायक क्षणी कमबॅक केलं. तरबेझ शम्सीनं 4 विकेट्स घेत आफ्रिकेची लाज वाचवली.

Advertisement

नेपाळला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 2 तर बरोबरी करण्यासाठी 1 रनची गरज होती. पण, ही रन करण्यात त्यांना अपयश आलं. नेपाळचा 18 वर्षांचा खेळाडू गुलशन झा रन आऊट झाला. आपली टीम हरली हे समजताच गुलशनला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. तो मैदानावरच लहान मुलासारखा रडू लागला. सोमपाल कामीनं जवळ येऊन त्याला धीर दिला. मैदानातला हा नाजूक प्रसंग पाहून सर्वजणच भावुक झाले होते.

Advertisement
Topics mentioned in this article