IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी वन-डे सिडनीमध्ये झाली. या वन-डेपूर्वी सर्वांचं लक्ष विराट कोहलीवर (Virat Kohli) होतं. या सीरिजमधील पहिल्या दोन वन-डेमध्ये (पर्थ आणि अॅडलेड) विराटला भोपळाही फोडता आला नव्हता. विराटच्या 304 वनडे मॅचच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असे घडल्यामुळे फॅन्सह क्रिकेट तज्ज्ञही काळजीत होते. मात्र सिडनीमध्ये जेव्हा किंग कोहलीने आपला पहिला रन घेतला, तेव्हा त्याने दिलेली खास प्रतिक्रिया आणि उत्साह पाहून हा एक रन नव्हे तर जणू त्याने 83 वे शतक झळकावले आहे, असेच वाटले!
पहिला रन आणि विराटची खास प्रतिक्रिया
सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच्या (SCG) या वनडे मॅचमध्ये, कॅप्टन शुभमन गिल 11 व्या ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. प्रेक्षकांनी 'किंग कोहली'चे जोरदार स्वागत केले. डेसिबल लेव्हल ओलांडणारा चाहत्यांचा हा उत्साह सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
THE LOUDEST CHEER FOR VIRAT KOHLI AT SCG. 🐐🔥
— Tanuj (@ImTanujSingh) October 25, 2025
- The Most Celebrated Cricketer Ever! pic.twitter.com/ZlsDlaF8mk
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीने आपली पहिला रन काढला. शून्यावर आऊट होण्याची हॅटट्रिक हुकवत विराटने वाइड मिड ऑनच्या दिशेने शॉट खेळून एका रनसह आपले खाते उघडले. हा पहिला रन घेतल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर मुलासारखे निरागस आणि उत्स्फूर्त हास्य (स्माईल) दिसले. 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटची अशी प्रतिक्रिया पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
हा एक रन घेतल्यानंतर विराट इतका खुश झाला की त्याने आपली मूठ वळवून प्रेक्षकांच्या दिशेने दाखवत आनंद व्यक्त केला.

पहिला रन का महत्त्वाचा?
प्रसिद्ध समालोचक आणि भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर अनेकदा म्हणतात की, "बॅट्समनची पहिली धाव त्याला कोणताही संकोच, भीती दूर करण्यास मदत करते आणि नव्या आत्मविश्वासाने त्याला पुढील डाव खेळण्याची प्रेरणा मिळते." सिडनीमध्ये विराटनं काढलेला पहिला रन आणि त्यानंतरचा त्याचा उत्साह याच गोष्टी अधोरेखित करतो.
यापूर्वी अॅडलेडच्या मॅचनंतर सुनील गावस्कर यांनी म्हटले होते की, "विराट कोहली हा अशा खेळाडूंपैकी नाही जो इतक्या लवकर हार मानेल. तो सिडनीमध्ये निश्चितपणे पुनरागमन करेल आणि 2027 चा वर्ल्ड कपही खेळेल." चाहत्यांना आशा आहे की गावसकर यांची ही 'भविष्यवाणी' खरी ठरावी आणि किंग कोहली 2027 पर्यंत आपला खेळ असाच सुरू ठेवेल.
( नक्की वाचा : Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा ट्विस्ट! अकायच्या PTM साठी विराटनं दौरा सोडला? व्हायरल दाव्याचं सत्य काय? )
रोहितची सेंच्युरी आणि भारताचा विजय
दरम्यान सिडनी वन-डे मध्ये रोहित शर्माची खणखणीत सेंच्युरी आणि विराटची हाफ सेंच्युरी याच्या जोरावर टीम इंडियानं 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मानं वन-डे कारकीर्दीमधील 33 वी सेंच्युरी झळकावली. त्यानं 125 बॉलमध्ये 121 रन्स केले. तर विराटनं त्याला खंबीर साथ देत 81 बॉलमध्ये 74 रन्स काढले. या अनुभवी खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 168 रन्सची पार्टरनरशिप करत टीम इंडियाच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world