IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात प्रतिष्ठेची T20 लीग अशी आयपीएलची ओळख आहे. आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं होतं. या ऑक्शनमध्ये दिग्गजांसह नवोदीतांवरही मोठी बोली लागली. क्रिकेटपटूंना नवी ओळख देणारी, त्यांचं नशीब बदलणारी स्पर्धा अशी आयपीएलची ओळख आहे. या स्पर्धेच्या ऑक्शनमध्ये ते घेणाऱ्या ऑक्शनरची भूमिका महत्त्वाची होती. यंदा मल्लिका सागर यांनी ही भूमिका पार पडली. दोन दिवस न थकता, शांतपणे हे ऑक्शन घेणाऱ्या मल्लिकांची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत मल्लिका सागर?
48 वर्षांच्या मल्लिकानं अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून करियरला सुरुवात केलीय. त्यांनी क्रिस्टीज या आंतरराष्ट्रीय ऑक्शन हाऊसमध्ये काम केलंय. त्यानंतर त्या पहिल्या भारतीय महिला ऑक्शनर बनल्या. त्या 2001 पासून या क्षेत्रात काम करत आहेत. एक ऑक्शनर म्हणून त्यांना मोठा अनुभव आहे.
मल्लिका यांनी यापूर्वीही आयपीएल ऑक्शनर म्हणून काम केलं आहे. त्यांनी आयपीएल 2023 मध्ये ही जबाबदारी सांभळली होती. त्याचबरोबर त्या प्रो कबड्डी लीगमध्ये ऑक्शनर होत्या.
( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction : CSK चं मॅजिक त्रिकूट पुन्हा एकत्र, धमाका होणार! )
126 कोटींची संपत्ती
मुळच्या मुंबईच्या असलेल्या मल्लिका या आर्ट इंडिया कन्सल्टंट या संस्थेत काम करतात. मीडिया रिपोर्टनुसार मल्लिका सागर यांची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच 126 कोटींच्या जवळपास आहे. आयपीएलमधील पहिले 10 सिझन रिचर्ड मॅडली ऑक्शनर होते. आयपीएल 2022 मध्ये चारु शर्मा यांनी अगदी शेवटच्या क्षणी ऑक्शनची जबाबदारी सांभाळली होती. पण, यंदा मल्लिका सागर यांनी ही जबाबदारी सांभाळली.
ऋषभ पंत ठरला महागडा
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये अपेक्षेनुसार ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनौ सुपर जायंट्सनं 27 कोटींना खरेदी केलं. आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कॅप्टन श्रेयस अय्यरही चांगलाच महागडा ठरला. त्याला पंजाब किंग्जनं 26 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केलं. तर कोलकाता नाईट रायडर्सनं व्यंकटेश अय्यरला खरेदी करण्यासाठी 23 कोटी 75 लाख रुपये मोजले. अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल या भारतीय बॉलर्सना खरेदी करण्यासाठी देखील अनेक टीम उत्सुक होत्या. पण, पंजाब किंग्जनं या दोघांना प्रत्येकी 18 कोटींना खरेदी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world