- कॅट गोट्झे यांनी जुन्या लँडलाईन फोनला ब्लूटूथ-कंपॅटिबल करून फिजिकल फोन्स नावाचा व्यवसाय सुरू केला
- या फोनद्वारे आयफोन आणि अँड्रॉइड दोन्हीशी ब्लूटूथद्वारे कनेक्ट होऊन रेट्रो बेलसह कॉल करता येतात
- जुलै २०२५ मध्ये सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यावर तीन दिवसांत अंदाजे एक कोटी रुपयांची विक्री झाली
20 व्या शतकापर्यंत लँडलाईन फोन ही प्रत्येक घराची गरज होती. मोबाईल फोन वापरणं जसंजसं स्वस्त होत गेलं तेव्हापासून घरोघरी दिसणारे लँडलाईन गायब होऊ लागले. लोकांना स्मार्टफोनची सवय लागली आणि लोकं तासनतास मोबाईल पाहू लागले. मोबाईलचा वापर हा संवादासाठी असतो असा समज होता, मात्र स्मार्टफोनमुळे संवादाशिवाय इतर गोष्टींनाच जास्त प्राधान्य मिळू लागले. स्मार्टफोनचं एकप्रकारे व्यसनच आपल्यापैकी अनेकांना लागलं आहे. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी कॅट गोटझे या तरुणीने एक अनोखी शक्कल लढवली आहे. तिने लँडलाईन फोनला आधुनिक ब्लूटुथ तंत्रज्ञानाची जोड दिली. ऑनलाइन विश्वात कॅटजीपीटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणीने स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल या प्रश्नातून हा शोध लावला. तिने आता ब्लूटूथ असलेले लँडलाईन फोन विकण्यास सुरूवात केली असून हा तिचा नवा व्यवसायच झाला आहे.
3 दिवसांत 1 कोटींहून अधिकची कमाई... (viral business success)
सीएनबीसी मेक इटच्या अहवालानुसार जुलै 2025 मध्ये हे उत्पादन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांत तिने 1 कोटी 8 लाख रुपयांची (1,20,000 डॉलर्स) कमाई केली. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस 'कॅट'च्या कंपनीने 3000 हून अधिक लँडलाईन फोन विकलेत. त्यातून तिच्या कंपनीने 2कोटी 52 लाख रुपयांची (2,80,000 डॉलर्स) कमाई केली आहे. जुलै महिन्यात कॅटने तयार केलेल्या या फोनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हापासून या फोनला असलेली मागणी वाढली आहे. कॅटला स्क्रीन टाईम कमी करायचा होता. मात्र असं करत असताना फोनवरून होणारा संवादही कमी होईल असं तिला वाटत होतं. घरात लँडलाईन फोन असता तर ही समस्या आली नसती असं कॅटला वाटत होतं, ज्यामुळे तिने लँडलाईन फोनमध्ये ब्लूटूथ डिव्हाईस बसवलं जे मोबाईलशी कनेक्ट होणारं होतं. या लँडलाईन फोनला फार प्रतिसाद मिळणार नाही असं तिला वाटलं होतं, मात्र घडलं उलटंच.
फोनची 5 मॉडेल बाजारात आणली
कॅटने तयार केलेल्या लँडलाईन फोनची 5 मॉडेल उपलब्ध आहेत. या फोनची किंमत 8,100 ते 9,900 रुपये (90 ते 110 डॉलर्स) दरम्यान आहे. हे फोन iOS आणि अँड्रॉइड दोन्ही उपकरणांशी जोडले जाऊ शकतात. व्हॉट्सॲप आणि फेसटाइम ऑडिओ कॉल्ससाठीही याचा वापर करता येतो. या फोनवरून नंबर डायल करता येतात आणि स्टार बटण दाबून सिरी किंवा गुगल असिस्टंटचा वापरही करता येतो. जुन्या काळातील लँडलाईनप्रमाणे यात कॉलर आयडी दिसत नाही.
19 मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओचा विषय काय? VIDEO मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर जेलमध्ये जाल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world