Pune Women Viral Video: पुणे शहरातील वाहतुक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा अन् चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीने नागरिक त्रासले असतानाच पुण्यातील बेशिस्त वाहनचालकही डोकेदुखी ठरत आहेत. राँग साईडने वाहन चालवणे, विना हेल्मेट गाड्या पळवणे, नो एन्ट्रीमध्ये कार पार्क करणे असे प्रकार पुण्यामध्ये सर्रास पाहायला मिळतात. अशाच बेशिस्त वाहनचालकांना एका काकुंनी चांगलाच धडा शिकवला आहे, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पुणेकर काकुंची गांधीगिरी!
पुण्यामध्ये बेशिस्तपणे वाहन चालवण्याचे प्रकार इतके वाढत आहेत की फुटपाथवरुन चालणेही अवघड झालं आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वार थेट फुटपाथवरुन गाड्या पळवतात. पुण्यामध्ये हा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. मात्र अशा वाहनचालकांमुळे फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या वाहनचालकांना पुणेकर काकुंनी गांधीस्टाईलने धडा शिकवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकीस्वार रस्ता सोडून फुटपाथवरुन गाड्या चालवत असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. या बेशिस्त वाहन चालकांना एका काकुंनी चांगलाच धडा शिकवला. फुटपाथवर उभे राहून त्यांनी थेट या वाहनचालकांची आरतीच ओवाळली. समोर गाड्या येत असतानाच काकू रस्त्यात उभे राहून आरती ओवाळताना दिसत आहेत. शहरातील पाषाण परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्त्यात वाहनचालकांची ओवाळली आरती!
'पुणेरी स्पिक्स' या ट्वीटर अकाऊंवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काकुंच्या या गांधीगिरी स्टाईलचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी शहरात वाहतूक कोंडी प्रचंड असल्याने बाईकस्वारांना असा मार्ग निवडावा लागतो, यामध्ये त्यांची चूक नाही, असे म्हणत समर्थनही केले आहे.
पाषाण येथे फुटपाथ वरून गाडी चालवणाऱ्या लोकांची आरती .. 🫡🏍️ pic.twitter.com/3xKftKWHVZ
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 10, 2025
एका युजरने मॅडम भर रस्त्यावर चालू असलेल्या बेकायदेशीर व्यावसायिकांसमोर, बेकायदेशीर रिक्षा थांब्यासमोर, बेकायदेशीर पार्किंग लॉटसमोर, दुकानदारांच्या जाळ्या, दगडांसमोर, दुकानदाराने रस्त्यावर मांडलेल्या वस्तूंसमोर पण अशीच आरती करा, म्हणजे रस्ते मोकळे होतात की ते बघू? अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकाने फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांना उगाचच नावे ठेवू नका शहराचे जे प्रकारचे प्लॅनिंग आहे ज्या प्रकारे सिग्नलची स्थिती आहे, ज्या प्रकारचे ट्राफिक आहे, हे पाहून करावे काय? असा सवालही उपस्थित केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world