Rain Alert : सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. तसं पाहता गेल्या काही दिवसात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र लवकरच तुफान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा तसा कोरडा जरी गेला असला तरी 14,15, 16,17 ऑगस्ट या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज सकाळी 9.30 वाजेनंतर पालघर, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात, एनआयके आणि तेलंगणाच्या काही भागात पुढील 1 ते 2 तास तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आयएमडीकडून (IMD) हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय कोकण-गोवा प्रदेशात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Maharashtra Monsoon Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
फिरण्याचा प्लान करीत असाल तर हे लक्षात ठेवा...
पुढच्या आठवड्यात तीन दिवस सलग सुट्टी असतील. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सार्वजनिक सुट्टी राहील. त्यानंतर शनिवार-रविवार असेल, म्हणजे सलग तीन दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. या दिवसात महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्लानिंग करण्यापूर्वी आधी सर्व परिस्थिती पाहून बुकिंग करावं.
स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा म्हणाले की, समुद्रात कमी दाबा पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात हवामानविषयक हालचाली वाढतील. ज्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कोकण आणि गोव्यात मान्सून लक्षणीयरीत्या मजबूत होईल. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या 11 राज्यांना हाय अलर्ट...
महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 11 राज्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट दिला आहे. या राज्यांमध्ये पुढील आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.