
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 11 आणि 12 ऑगस्टसाठी अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
( नक्की वाचा: महाराष्ट्रातील बेपत्ता प्रवाशाचे नाव कळाले, शोध युद्धपातळीवर सुरू )
कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि पालघरमध्ये दमदार पाऊस
पुणे घाट, सातारा घाट, आणि कोल्हापूर घाट या भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस, तसेच 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. गेल्या 24 तासांतील आकडेवारी पाहिल्यास, रत्नागिरी (114 मिमी) आणि पालघर (75 मिमी) या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र, पुढील काळात कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा: लग्नानंतर दोन महिन्यांनी नवविवाहित तरुणाला प्रेयसीनं पळवलं! धक्कादायक प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ )
शुक्रवारपासून वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर
राज्यात मान्सून सक्रिय असला, तरी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय तर काही ठिकाणी पाऊस समाधानकारक झालेला दिसत नाहीये. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस वाशिम जिल्ह्यात झाला असून, येथे 41.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या उलट गेल्या 24 तासांत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण शून्य मिमी आहे. ही धक्कादायक आकडेवारी कृषी विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
( नक्की वाचा: आयब्रोज करायला गेली अन् लिवर फेल करून आली )
गेल्या 24 तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या जिल्ह्यांमध्ये वाशिम (41.7 मिमी) आघाडीवर आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये 28.4 मिमी, अमरावतीमध्ये 17.8 मिमी, जालनामध्ये 17.7 मिमी, आणि बुलढाणामध्ये 17.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, राज्याच्या काही भागांमध्ये आजही पाऊस झालेला नाही, ज्यामुळे शेतीत मोठी चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत शून्य मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे या जिल्ह्यांतील शेतकरी चिंतेत आहेत. याउलट, हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील सरासरीच्या तुलनेत 116.5 टक्के, वाशिममध्ये 117.9 टक्के, जालनामध्ये 109.74 टक्के आणि सांगलीमध्ये 103.07 टक्के पाऊस झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world