AI Model Shayari Viral Video: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) वाढती ताकद आता सोशल मीडियावर लोकांना थक्क करू लागली आहे. अलीकडेच व्हायरल झालेल्या एका तरुणीच्या शायरीच्या व्हिडीओला कोट्यवधी लोकांनी पसंती दर्शवलीय. पण प्रत्यक्षात हा व्हिडीओ 'AI जनरेटेड' असल्याचे समोर आलंय. या व्हिडीओमुळे केवळ नेटकरीच चक्रावले नाहीत, तर AI शी संबंधित विश्वासार्हता, ओळख आणि कॉपीराइट यासारखे गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत.
3 कोटी व्ह्यूज मिळालेला व्हिडीओ निघाला AI जनरेटेड | Tanvi Joshi AI Model
इस्टाग्रामवर 'तन्वी जोशी' नावाच्या प्रोफाइलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेली एक महिला उर्दू भाषेतून शायरी सांगताना दिसली. शायरीचे शब्द होते- "खानदानी रईस रखते हैं मिजाज नरम अपना… तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी दौलत नई-नई है". या व्हिडीओला एका दिवसात 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. लोक शायरीचे, शायरीच्या अर्थाचे आणि शब्दाच्या उच्चारांचे तोंडभरून कौतुक करतायेत.
(नक्की वाचा:Sun Sun Sunday...विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी पद्धत, 2 कोटी लोकांनी पाहिला सरकारी शिक्षकाचा Funny Video)
पाहा व्हिडीओ
प्रत्यक्षात 'तन्वी जोशी' अस्तित्वातच नाही
पण नंतर असे समोर आले की, तन्वी जोशी अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही तर संबंधित व्हिडीओ AI जनरेटेड आहे. या प्रोफाइलवरील व्हिडीओमधील तरुणीचा चेहरा पूर्णतः परफेक्ट दिसतोय आणि वेगवेगळ्या व्हिडीओंमध्ये आवाजही बदलत राहतोय. म्हणजेच लाखो लोकांना एका आभासी (Virtual) व्यक्तीचा व्हिडीओ खराखुरा वाटला. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वापरलेला आवाज ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका मरजिया शानू पठाण यांचा असल्याचं म्हटलं जातंय. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हीच शायरी सांगतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता, या व्हिडीओला सुमारे 9 लाख व्ह्यूज मिळाले होते. जेव्हा हा AI व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा त्यांनी स्वतः कमेंट केली की- "अरे, हा तर माझा आवाज आहे!" त्यानंतरच लोकांना समजले की व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला होता.
(नक्की वाचा: AI VIDEO पोस्ट करताय? सावधान! मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता थेट होणार कारवाई, वाचा सर्व नियम)
AI व्हिडीओमुळे वाढली चिंता
या घटनेवरून AIद्वारे तयार केलेले चेहरे, आवाज आणि सादरीकरण आता इतके वास्तववादी होतायेत की ते ओळखणेही कठीण होत चाललंय. यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतायेत:
- कोणाचाही आवाज किंवा आशय (Content) परवानगीशिवाय कसा वापरला जात आहे?
- याचे खरे श्रेय कोणाला मिळणार?
- AI च्या माध्यमातून कोणाचीही हुबेहूब नक्कल करणे सोपे ठरतंय का?
डिजिटल युगात सतर्क राहण्याची गरज
सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते, याचा गंभीर इशारा या व्हिडीओद्वारे मिळतोय. जसेजसे एआय तंत्रज्ञान प्रगत होत आहे, तसतसे डिजिटल कंटेंट समजून घेताना अधिक सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.
(डिस्क्लेमर: ही बातमी सोशल मीडियावरील युजर्सच्या पोस्टवर आधारित तयार करण्यात आली आहे. 'एनडीटीवी' या कंटेंटच्या प्रामाणिकतेची पुष्टी करत नाही.)