IAS Pari Bishnoi Success story: यूपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. यामध्ये पास व्हायला अथक मेहनत, सातत्य आणि प्रचंड आत्मविश्वास लागतो. पण मनात जिद्द अन् डोळ्यासमोर ध्येय असेल तर अशी अशक्य स्वप्नेही पूर्ण होतात. आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांनीही नुकताच त्यांचा यूपीएससी प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात त्यांनी अपयशानंतर आलेल्या नैराश्यावर मात करून मिळवलेल्या यशाची कहाणी सांगितली आहे. सोबतच खरा विजय तेव्हाच होतो जेव्हा हार मानत नाही, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला आहे.
परी बिश्नोई यांची सक्सेस स्टोरी!
परी बिश्नोई यांनी सांगितले की, 2017 मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिल्यानंतर त्या अपयशी ठरल्या आणि त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळला. या अपयशाने त्यांना मानसिक आणि शारीरिकरित्या खूप प्रभावित केले. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्या राजस्थानमधील आपल्या घरी परतल्या. या काळात त्यांनी स्वतःला पूर्णपणे वेगळे केले आणि त्या सतत तणावाखाली राहू लागल्या. यातून त्यांनी स्ट्रेस इटिंग सुरू केली, ज्यामुळे त्यांचे वजन तब्बल ४५ किलोने वाढले. त्यांनी हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण असल्याचे सांगितले, जिथे शरीर आणि मन दोन्ही कमजोर झाले होते.
काही महिन्यांनंतर जेव्हा यूपीएससी परीक्षेचा इंटरव्ह्यू कॉल आला, तेव्हा त्यांच्यात एक नवी ऊर्जा जागृत झाली. त्यांनी ठरवले की, आता केवळ एका रँकसाठी नाही, तर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी लढायचे. यानंतर त्यांनी स्वतःला शिस्त लावली. त्यांनी नियमित वर्कआऊट सुरू केले, संतुलित आहार घेतला आणि आत्मनियंत्रणावर काम केले. त्यांच्या आयुष्यातील हाच मोठा बदल त्यांच्या नवीन यशाचा आधार बनला.
परी बिश्नोई यांनी 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आणि त्यांनी ऑल इंडिया 30 रँक मिळवला. त्यांचे हे यश केवळ एका परीक्षेतील विजय नसून, आत्मविश्वास आणि धैर्याचे मोठे उदाहरण आहे. सध्या त्या सिक्कीम कॅडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि सोशल मीडियावर लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनल्या आहेत.
तरुण- तरुणींना दिला मोलाचा सल्ला!
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी लिहिले आहे: "खरी जीत तेव्हा होते, जेव्हा तुम्ही हार मानत नाही. जर तुम्ही सध्या एखाद्या कठीण टप्प्यातून जात असाल, तर तुम्ही अडकलेले नाही, तुम्ही तुटलेले नाही. तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता." त्यांच्या या पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या असून, अनेकांनी त्यांना "हार मानण्यापूर्वी एकदा आणखी प्रयत्न करण्याची" प्रेरणा मिळाल्याचे सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world