'भिंतीवरी कालनिर्णय असावे' या जाहिरातीसह मराठी माणसांच्या घरोघरी भिंतीवर विराजमान असलेले कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय. दरवर्षी अनेक कॅलेंडर निघत असली तर कालनिर्णयची लोकप्रियता कायम आहे. रोजचे पंचांग, दिनविशेष, राशिभविष्य, मान्यवरांचे लेख या आणि वेगवेगळ्या माहितींसह भरगच्च असे कालनिर्णयचे कॅलेंडर असते. जयंत साळगावकरांनी 1973 साली कालनिर्णय सुरु केले. ते आजही तितकेच लोकप्रिय आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंग्रजी वर्ष 2024 संपत आलंय. आता 2025 सुरु होण्यास एक महिन्याचा कालावधी आहे. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कालनिर्णयची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असते. याच काळात सोशल मीडियावर #boycott_kalnirnay हा ट्रेंड सुरु झालाय. फेसबुक तसंच X (पूर्वीचे नाव ट्विटर) या सोशल मीडियावर हा ट्रेंड सध्या सुरु आहे. आपल्या आवडत्या कॅलेंडरबाबत हा ट्रेंड सुरु झालेला पाहून अनेक युझर्सनी आश्यर्य व्यक्त केलं असून त्याचं कारण विचारलं आहे.
काय आहे कारण?
विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृद्गंध पुरस्कार' वितरण नुकतंच पार पडलं. सुरेखा पुणेकर (लोककला), सुरेश सावंत ( सामाजिक क्षेत्र),आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र),दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ज्ञानेश महाराव (लेखक आणि पत्रकार ) यांना हा पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, यराज साळगावकर (संपादक, कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सोशल मीडियातील पोस्टनुसार जयराज साळगावकर यांच्या हस्ते ज्ञानेश महाराव यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे नाराज होऊन काही युझर्सनी #boycott_kalnirnay सुरु केला आहे. या सर्व युझर्सनी यापूर्वीही महाराव यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याचा फटका त्यांना हा पुरस्कार देणारे जयराज साळगावकर आणि त्यांच्या कालनिर्णय कॅलेंडरला बसतोय. कालनिर्णय कॅलेंडर घेऊ नका असं आवाहन या पोस्टच्या माध्यमातून युझर्स करत आहेत.
हिंदू देवतांवर बिभत्स भाष्य करणार्या महारावला पुरस्कार देणार्या “कालनिर्णय” चा जाहीर निषेध. ❌😠#boycott_kalnirnay pic.twitter.com/jJGTSYX9MM
— गणेश अरुण काळे (@X9nYSJJT9e2gjU7) November 28, 2024
भिंतीवर कालनिर्णय नसावे !!
— Prem Bhogade - प्रेम भोगडे (@PremBhogade) November 28, 2024
#Boycott_kalnirnay
काय म्हणाले होते महाराव ?
ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य करुन भावना दुखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नवी मुंबईतल्या वाशीत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी भाषण केलं होतं. या भाषणातले काही मुद्दे हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर कोल्हापूरच्या हिंदुत्वादी संघटनांनी महाराव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरामुळे महाराव यांचा गौरव करणाऱ्या कालनिर्णयकार जयराज साळगावकर यांच्यावर युझर्स नाराज झाले असून त्यांनी कालनिर्णयवर बहिष्कार घाला ही मोहीम सुरु केली आहे.
( नक्की वाचा : Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ? )
कालनिर्णयकडून स्पष्टीकरण
दरम्यान सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रेंडची दखल कालनिर्णयनं घेतली आहे. कालनिर्णयच्या हँडलवरुन ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय.'आमच्याकडून कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही. हे केवळ एक स्मृतिचिन्ह होते, जे सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कलाकारांना सन्मानपूर्वक देण्यात आले. याचा 'कालनिर्णय'शी संबंध नाही.' असं कालनिर्णयनं स्पष्ट केलंय.
आमच्याकडून कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही. हे केवळ एक स्मृतिचिन्ह होते, जे सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कलाकारांना सन्मानपूर्वक देण्यात आले. याचा 'कालनिर्णय'शी संबंध नाही.
— Kalnirnay (@Kalnirnay) November 28, 2024
आता 'कालनिर्णय' कडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर युझर्सचा राग शांत होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world