कोलकाता येथील एका लोकल ट्रेन प्रवासात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. कारण एका तरुणीने लोकल ट्रेनच्या महिला डब्यात कथितरित्या पेपर स्प्रे मारला, ज्यामुळे अनेक प्रवाशांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाला. ही धक्कादायक घटना सियालदहला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडली असून, प्रवाशांनी याचा व्हिडिओ काढला आहे.
व्हिडिओमध्ये, हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेल्या एका महिलेवर प्रवासी ओरडताना दिसत आहेत. डब्यात लहान मुले असताना तिने स्प्रे का वापरला, असा प्रश्न ते विचारत आहेत. "इथे लहान मुले असताना तू हे का केलेस?" असा एक आवाज ऐकू येत आहे.
व्हिडिओसोबत शेअर केलेल्या माहितीनुसार, ही महिला सियालदह येथून ट्रेनमध्ये चढली होती आणि एका सीटवरून तिचा दुसऱ्या महिला प्रवाशासोबत वाद झाला. तिला हवी असलेली सीट न मिळाल्याने, तिने कथितरित्या पेपर स्प्रे बाहेर काढला आणि दुसऱ्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका सहप्रवाशाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रागाच्या भरात या महिलेने गर्दीच्या डब्यात तो स्प्रे फवारल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Shah Rukh Khan - Alakh Pandey: ट्युशन घेत उभारली 14,510 कोटींची संपत्ती, 'फिजिक्सवाला'ने किंग खानला टाकलं मागे)
एका प्रत्यक्षदर्शीच्या पोस्टनुसार, "प्रत्येकजण खोकू लागला, त्यांच्या घशात आणि नाकात जळजळ होऊ लागली. दोन लहान मुलांना अस्वस्थ वाटू लागले." प्रवाशांनी तात्काळ त्या महिलेला घेरले आणि तिच्या बेजबाबदार कृतीबद्दल स्पष्टीकरण मागितले. नंतर तिला रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे, कारण पेपर स्प्रेचा वापर आत्मसंरक्षणासाठी असतो, इतरांना इजा करण्यासाठी नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.