मागील अनेक दिवसांपासन जी भीती होती ती अखेर खरी ठरली आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास 'खूप मोठे' सौर वादळ पृथ्वीवर धडकलं आहे. त्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. GPS आणि रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम तात्पुरते प्रभावित होऊ शकतात. या सौर वादळामुळे अमेरिकन यंत्रणा चिंतेत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील हेलन आणि मिल्टन या चक्रीवादळांचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर परिणाम होण्याची भीती त्यांना आहे.
अमेरिकेतील स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर NOAA च्या मते, मंगळवारी संध्याकाळी सूर्यापासून निघणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा (CME) उद्रेक झाला. ते गुरुवारी ताशी 24 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीवर पोहोचले.
(नक्की वाचा- Noel Tata : टाटा ट्रस्टचा नवा अध्यक्ष ठरला, बैठकीत झाला एकमतानं निर्णय)
चीनच्या शिन्हुआ न्यूज एजन्सीने सांगितले की, सौर वादळाची पातळी G4 (तीव्र) आहे. यामुळे, जगातील अनेक भागात रेडिओ ब्लॅकआउट होऊ शकतात. वीज ग्रीड आणि जीपीएस सेवा प्रभावित होऊ शकतात.
या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्यामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला होता. याने एवढा शक्तिशाली सोलर फ्लेअर उत्सर्जित केला, जो 7 वर्षातील सर्वाधिक होता. ते सोलर फ्लेअर एक्स-क्लास श्रेणीचे होते.
सोलार फ्लेअर म्हणजे काय?
सूर्य चुंबकीय ऊर्जा सोडतो तेव्हा प्रकाश आणि उत्सर्जित कणांमुळे सौर ज्वाला तयार होतात. हे फ्लेअर्स आपल्या सौरमालेत आतापर्यंत पाहिलेले सर्वात शक्तिशाली स्फोट आहेत. जे अब्जावधी हायड्रोजन बॉम्बच्या तुलनेत ऊर्जा सोडतात. त्यांच्यामध्ये असलेले कण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
(नक्की वाचा - इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?)
कोरोनल मास इजेक्शन म्हणजे काय?
कोरोनल मास इजेक्शन किंवा CME हे सौर प्लाझ्माचे मोठे ढग आहेत. सौर स्फोटानंतर हे ढग सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात अवकाशात पसरतात. अंतराळातील त्यांच्या परिभ्रमणामुळे ते विस्तारतात आणि अनेकदा कित्येक लाख मैलांचे अंतर गाठतात. अनेकवेळा ते ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्राशी टक्कर घेतात. जेव्हा त्यांची दिशा पृथ्वीकडे असते तेव्हा ते भू-चुंबकीय अडथळे आणू शकतात. यामुळे उपग्रहांमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि पॉवर ग्रीडवर परिणाम होऊ शकतो. जर त्यांचा प्रभाव गंभीर असेल तर ते पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळवीरांनाही धोक्यात आणू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world