Donald Trump Inauguration : आजपासून ट्रम्प पर्व सुरू होणार, कसा असेल सोहळा? भारतातून कोणाची उपस्थिती?

यंदा पहिल्यांदाच अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुणे येणार आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

आज 20 जानेवारीपासून ट्रम्प पर्व सुरू होणार आहे. 20 जानेवारीला ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पदार्पण करणार आहेत. पुढील काही तासात त्यांचा शपथ ग्रहण सोहळा सुरू होईल. त्यांच्या या शपथग्रहण सोहळ्यावर साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे. कसा असेल हा सोहळा? 

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी आयोजित शपथग्रहण सोहळा हा यंदा कॅपिटलच्या अंतर्गत सभागृहात होणार आहे. साधारणपणे शपथविधी सोहळा हा कॅपिटलसमोरच्या प्रांगणात करण्याची अमेरिकन परंपरा आहे. या सोहळ्याला सर्वसाधारण नागरिकही उपस्थित राहू शकतात. मात्र यंदा आर्टिक्ट वादळामुळे बर्फवृष्टीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे यंदाचा शपथविधी सोहळा हा सभागृहात होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण अमेरिकन नागरिकांना हा सोहळा प्रत्यक्षात पाहता येणार नाही. याआधी 1985 मध्ये राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचा शपथविधी सोहळाही कॅपिटलच्या सभागृहात घेण्यात आला होता. रोटुंडामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रतिकूल वातावरणात शपथविधी सोहळा झाला नाही तर रोटुंडा ही पर्यायी जागा आहे.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

दरम्यान या सोहळ्यासाठी पहिल्यांदाच परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. याआधी इतर देशांच्या प्रतिनिधींना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नसायचं. भारताकडून यंदा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - $TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा

ट्रम्प 2.0 : कसा असेल शपथविधी सोहळा?
20 जानेवारीला अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12 वाजता ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार हा सोहळा रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी पार पडेल. अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश डॉन रॉबर्टस हे ट्रम्प यांना शपथ देतील. 
ट्रम्प आपली पत्नी आणि पहिल्या महिला मेलेनिया ट्रम्प यांच्या साथीनं शपथ घेतील. कॅपिटल रोटुंडामध्ये यंदा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीनंतर ट्रम्प आपलं पहिलं अध्यक्षीय भाषण करतील. आपलं पहिलं अध्यक्षीय भाषण हे 2017 मधील भाषणापेक्षा वेगळं असेल असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. हे भाषण नागरिकांना एकत्रित आणणारं आणि प्रोत्साहन देणारं असेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील या सोहळ्यात सहभागी होतील. परंपरेनुसार ते ट्रम्प यांच्याकडे सत्तांतरण करताना साक्षीदार असतील. चार वर्षांपूर्वी निवडणुकीतील अपयशानंतर ट्रम्प यांनी मात्र बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. यंदा इतर ही देशांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

ट्रम्प 2.0 : शपथविधी सोहळ्यातील पाहुणे
यंदा पहिल्यांदाच अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुणे येणार आहे. यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी नेत्यांना आमंत्रण नव्हतं. केवळ राजदूत उपस्थित राहत होते. यंदा अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर माईली उपस्थित राहतील. माईली हे कट्टर ट्रम्प समर्थक मानले जातात. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलिनी उपस्थित राहण्यास उत्सुक आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मात्र उपस्थित राहणार नाहीत. ते त्यांच्या प्रतिनिधीला सोहळ्याला पाठवणार आहेत. भारताकडून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर उपस्थित राहणार आहे. तर काही भारतीय उद्योजकही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ट्रम्प यांचे सल्लागार एलॉन मस्क हे ही हजर असतील. अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेजोस आणि मेटाचे मार्क झुकरबर्गही या सोहळ्याला उपस्थित राहतील. तर इतर माजी राष्ट्राध्यक्ष ही या सोहळ्यात हजर असतील. माजी प्रथम महिला मिशेल ओबामा मात्र या सोहळ्याल उपस्थित राहणार नाहीत.

दरम्यान या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीनंही कॅपिटलभोवती कुंपणांचं जाळं उभारण्यात आलं आहे. तर शपथविधी सोहळा घटत्या तापमानामुळे खुल्या प्रांगणात न होता सभागृहात होणार आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याचा प्रमुख भाग असलेलं संचलनही यंदा होणार नाही. पेन्सिलव्हेनिया अव्हेन्यूमध्ये हे संचलन पार पडतं. यंदा ती परेड रद्द करण्यात आलीय. या परेडमध्ये सैन्य, स्कूल बँड, काही चित्ररथ आणि नागरिकांचे काही गटही सहभागी होतात. यंदा ही परेड मर्यादित स्वरुपात वॉशिंग्टनच्या कॅपिटल वन एरिनामध्ये होणार आहे. इथं 20 हजारांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण सोहळ्याचा खर्च सरकारी समितीकडून उचलला जातो. तर काही उद्योजकांनीही या सोहळ्यासाठी देणगी दिलेली आहे. यात मार्क झुकरबर्ग, बेजोस, अॅपलचे टीम कुक यांचा समावेश आहे. 2017 मध्ये ट्रम्प यांनी त्याच्या शपथविधीसाठी रेकॉर्डब्रेक असे 106.7 मिलियन युएस डॉलर्स जमवले होते. यंदा हा आकडा 170 मिलियन युएस डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

दरम्यान शपथग्रहण करताच ट्रम्प हे पहिल्याच दिवशी कामाला लागणार आहेत आणि 100 हून अधिक निर्देश जारी करण्याचा इरादा याआधीच ट्रम्प यांनी बोलून दाखवलाय. त्यामुळे हा शपथविधी सोहळा कसा पार पडतोय. पहिल्याच दिवशी ट्रम्प कोणते निर्णय घेणार काय आदेश जारी करणार याकडे अमेरिकेसह इतरही देशांचं लक्ष असणार आहे.