मानसी पिंगळे, प्रतिनिधी
अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार? याचं उत्तर जगाला मिळालं आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीमध्ये माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) विजयी झाले आहेत. ट्रम्प यांच्या संपूर्ण निवडणूक प्रचारात टेस्ला आणि X (पूर्वीचे नाव ट्विटर) चे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) आघाडीवर होते. ट्रम्प यांनी देखील त्यांच्या विजयी भाषणात मस्क यांचं जोरदार कौतुक केलं. ट्रम्प यांच्या विजयाचा मस्क यांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मस्क यांना महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते.
विजयी भाषणात ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय निश्चित झाल्यानंतर देशाला उद्देशून भाषण केलं. त्यांनी या भाषणात त्यांचे मतदार, समर्थकांचे आभार मानले. Tesla आणि SpaceX चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांचीही त्यांनी जोरदार प्रशंसा केली.
'आपल्या सर्वांमध्ये एक स्टार उपस्थित आहे. एक नवीन तारा जन्माला आला आहे. इलॉन... हा एक अद्भूत माणूस आहे. आज रात्री आम्ही एकत्र बसलो होतो. तुम्हाला माहीत आहे का, तो फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनियाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचार करत आहे. हे फक्त इलॉन करू शकतो, म्हणूनच मला तू खूप आवडतोस, इलॉन...' असं ट्रम्प यांनी सर्व जगासमोर सांगितलं.
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी वर्णन केलेला नवा तारा म्हणजेच इलॉन मस्क यांचा भाव वधारणार आहे, हे नक्की आहे.
( नक्की वाचा : US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक? 6 गोष्टी ठरल्या निर्णायक )
कंपन्यांना होणार फायदा
एनबीसी न्यूजनूसार, डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानतंर देशातील कॉर्पोरेट सेक्टरमधील नियम बदलणार निश्चित आहे. त्याचा फायदा मस्क यांच्या कंपन्यांना होऊ शकतो. इलॉन मस्कची SpaceX कंपनी सरकारी कॉन्ट्रॅक्टच्या रूपात दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई करू शकते. सध्या अमेरिकेतील सरकारी अंतराळ संस्था नासाला SpaceX हा एकमेव पर्याय आहे, ज्याद्वारे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेले जाते आणि त्यांना परत आणलेही जाते. याशिवाय SpaceX कंपनीला संरक्षण विभागाकडूनही कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते.
नवी जबाबदारी मिळणार?
ट्रम्प यांच्या प्रचार अभियानाचे वरिष्ठ सल्लागार ब्रायन ह्यूजेस यांनी NBC News ला बोलताना याबाबत संकेत दिले होते. 'अमेरिकन सरकारनं जास्त कुशलतेनं काम करानं आणि नागरिकांच्या पैशाचा अधिक योग्य वापर करावा यासाठी खास आयोग तयार करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. त्या आयोगाचं नेतृत्त्व मस्क यांनी करावं अशी ट्रम्प यांची इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.
( नक्की वाचा : US Election 2024 : अमेरिकेला कशाची गरज? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी भाषणातील 10 प्रमुख मुद्दे )
इलॉन मस्क हे प्रतिभावंत आहेत. ते कल्पक, आत्युधानिक असून त्यांनी प्रभावी यंत्रणा तयार करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे, असंही ह्यूजेस यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मस्क यांची ट्रम्प यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होऊ शकते, ही चर्चा सुरु झाली आहे.