जाहिरात

US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक? 6 गोष्टी ठरल्या निर्णायक

US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक? 6 गोष्टी ठरल्या निर्णायक
मुंबई:

US election Results Donald Trump Victory:  अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय ऐतिहासिक आहे. त्यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमॉक्रेटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला. अमेरिकेचा माजी अध्यक्ष एक निवडणूक हरल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्ष बनला आहे. अमेरिकेच्या निवडणूक इतिहासातील 130 वर्षांमधील ही पहिली घटना आहे. ट्रम्प यांच्या विजयाची 6 महत्त्वाची कारणं पाहूया


अर्थव्यवस्था

अमेरिकेची अर्थव्यवस्था हा या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा होता. जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकन अर्थव्यवस्थेत बराच चढ-उतार सहन करावा लागला, असं अनेकांचं मत आहे. 2020 साली ट्रम्प पराभूत झाल्यानंतर बायडेन अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेला कोरोना महामारी सहन करावी लागली. त्यामध्ये 3.5 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या सर्व काळात अर्थव्यवस्थेला फटका बसला. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात हा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महागाई

अमेरिकेत 1970 नंतर यंदा सर्वाधिक महागाई आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला हा प्रभावित करणारा मुद्दा आहे. ट्रम्प यांनी हा मुद्दा प्रभावीपणे प्रचारसभेत मांडला. त्यांनी बायडेन सरकारची मागील चार वर्षांच्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीशी तुलना केली. अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्या मुद्यांना प्रतिसाद दिला, हे निकालावरुन स्पष्ट झालं आहे.

जो बायडेन यांचं वय आणि धोरण

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा अध्यक्ष जो बायडेन आघाडीवर होते. त्यांची पक्षाकडून पुन्हा एकदा निवड होणार हे स्पष्ट होतं. पण, प्रचार अर्ध्यावर आल्यानंतर त्यांचं वय आणि धोरण मतदारांवर नकारात्मक प्रभाव टाकत आहे, हे पक्षाला लक्षात आलं. अध्यक्षपदाच्या वादविवादामध्ये ट्रम्प यांच्यासमोर बायडेन निस्तेज वाटले. पक्षातील वाढत्या विरोधामुळे बायडेन यांना अखेर माघार घ्यावी लागली. 

US Election 2024 : अमेरिकेला कशाची गरज? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

( नक्की वाचा : US Election 2024 : अमेरिकेला कशाची गरज? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी भाषणातील 10 प्रमुख मुद्दे )

कमला हॅरीस यांची उशीरा एन्ट्री

जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर डेमॉक्रेटीक पक्षानं कमला हॅरीस यांना उमेदवारी दिली. हॅरीस यांनी त्यांच्या बाजूनं जोरदार प्रयत्न केले. निवडणूक सर्वेक्षणातही त्याचं प्रतिबिंब उमटलं. सुरुवातीच्या टप्प्यात ट्रम्प बॅकफुटवर गेले होते. पण, त्यानंतर हळूहळू चित्र बदलत गेलं. दोन्ही नेत्यांमधील लढत रंगतदार बनली. 

हॅरीस यांची जुलै महिन्यात अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत निवड झाली. त्यानंतर आपण कशा चांगल्या अध्यक्ष ठरु हे मतदारांना पटवून देण्याचं त्यांना मोठं आव्हान होतंं. अनेक मतदारांना आपण उमेदवार आहोत, हे माहितीच नव्हतं, अशी कबुली हॅरीस यांनी स्वत: दिली होती. 

अवैध इमीग्रेशन

अमेरिकन नागरिकांसाठी हा भावनात्मक मुद्दा आहे. तो ट्रम्प यांनी जोरदारपणे मांडला. त्यांनी बायडेन यांच्यावर निष्काळजीपणाचा आणि लोकांना मदतीच्या नावाखाली देशातील पैसा बाहेरच्या देशांना दिल्याचा आरोप केला. इमीग्रेशनच्या मुद्यावर ट्रम्प यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अमेरिकन नागरिकांना पटली. ट्रम्प यांनी या मुद्यावर बायडेन प्रशासनावर जोरदार टीका केली. मतदारांनी ट्रम्प यांच्या बाजूनं कौल दिला.  

परराष्ट्र धोरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात अमेरिकेचं परराष्ट्र धोरण नीट नसल्याचं आरोप केला. कमला हॅरीस बायडेन सरकारमध्ये उपाध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांना देखील ट्रम्प यांच्या प्रश्नांना उत्तर देणं जड गेलं. अखेर कमला हॅरीस यांना बायडेन सरकारपेक्षा वेगळं धोरण राबवणार असल्याचं सांगावं लागलं. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्या विषयावरही त्यांनी कमला हॅरीस यांची कोंडी केली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: