अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा गोळीबार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै महिन्यानंतर ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हा हल्ला झाला आहे. रविवारी फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्समध्ये गोल्फ खेळत असताना हा हल्ला झाला. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. एफबीआयने हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न मानला. दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ट्रम्प यांनी स्वत: सुरक्षित असल्याची माहिती दिली.
ट्रम्प यांच्यावर गोळ्या कोणी चालवल्या आणि ट्रम्प हे लक्ष्य होते की अन्य कोणी गोळी झाडली हे अद्याप समजू शकलेले नाही. गोल्फ कोर्सजवळ झालेल्या वादातून दोन लोकांमध्ये गोळीबार झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, ही अधिकृत माहिती नाही.
सुरक्षारक्षकांनी गोल्फ कोर्सजवळ एके-47 असलेल्या एका व्यक्तीला पाहिले. सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर गोळीबार देखील केला. याप्रकरणी 1 संशयिताला अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी याबाबत म्हटलं की, "माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडा येथील गोल्फ कोर्सजवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. ते सुरक्षित असल्याचा मला आनंद आहे."