Global Internet Outage: डिजिटल जगतातील महत्त्वाचे प्लॅटफॉर्म मंगळवारी अचानक ठप्प (Outage) झाल्यामुळे जगभरातील कोट्यवधी युजर्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सोशल मीडिया साईट 'X' सह ओपनएआय (OpenAI), गूगल जेमिनी (Google Gemini), पेर्प्लेक्सिटी (Perplexity), उबर (Uber) आणि कॅनव्हा (Canva) यांसारख्या अनेक मोठ्या सेवांवर याचा परिणाम झाला. सायबर सिक्युरिटी कंपनी असलेल्या 'क्लाउडफेअर' (Cloudflare) मधील मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे (Outage) ही समस्या निर्माण झाली, ज्यामुळे इंटरनेटच्या कामावर परिणाम झाला आणि युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मोठ्या प्लॅटफॉर्मवर परिणाम
मंगळवारी झालेल्या या आउटेजमुळे 'X' (पूर्वीचे ट्विटर) सह अनेक मोठ्या डिजिटल सेवा विस्कळीत झाल्या होत्या. 'डाउनडिटेक्टर'नुसार, या बिघाडाबाबतच्या तक्रारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:37 वाजता सर्वाधिक प्रमाणात नोंदवल्या गेल्या. फक्त भारतातच 'क्लाउडफेअर' संबंधित 3,000 हून अधिक तक्रारींची नोंद झाली होती, ज्यामुळे या घटनेची व्यापकता लक्षात येते. 'X' वरील सेवा प्रभावित झाल्यानंतर काही युजर्ससाठी प्लॅटफॉर्म काही काळासाठी पूर्ववत झाले, परंतु अजूनही अनेक युजर्स गडबडीच्या तक्रारी करत आहेत.
( नक्की वाचा : मक्का-मदीनामध्ये मृत्यू झाल्यास मृतदेह का परत आणता येत नाही? काय आहे नियम? )
काय आहे कारण?
ज्या सायबर सिक्युरिटी कंपनीमुळे हा बिघाड झाला, त्या 'क्लाउडफेअर'ने अधिकृत निवेदन जारी करून आउटेजची बाब मान्य केली आहे. मात्र, या आउटेजचा नेमका आणि एकूण किती वेबसाइट्सवर परिणाम झाला आहे, हे समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागेल आणि त्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "क्लाउडफेअरला एका समस्येची माहिती मिळाली आहे आणि तिची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या समस्येमुळे अनेक ग्राहक प्रभावित झाले आहेत: मोठ्या प्रमाणात 500 Error येत आहेत, तसेच क्लाउडफेअरचे डॅशबोर्ड (Dashboard) आणि एपीआय (API) देखील फेल होत आहेत."
( नक्की वाचा : Property Tax: ज्येष्ठ नागरिकांसाठी 30% मालमत्ता कर सवलत खरी की खोटी? BMC ने दिलं स्पष्टीकरण )
काय आहे 'क्लाउडफेअर' ?
'क्लाउडफेअर' ही एक अशी कंपनी आहे जी इंटरनेटचे कामकाज सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्याआड काम करते. इंडिपेंडेंट (Independent) वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 'क्लाउडफेअर' ही कंपनी 'अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस' (Amazon Web Services) सारख्या वेब-इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादारांच्या (Web-Infrastructure Providers) मोठ्या गटाचा भाग आहे. म्हणजेच, ही कंपनी वेबसाइट्सचा डेटा युजर्सपर्यंत जलदगतीने आणि सुरक्षितपणे पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते.
या कंपनीचा 'जगातील सर्वात मोठ्या नेटवर्क्सपैकी एक' असल्याचा दावा आहे, जे 'लाखो इंटरनेट प्रॉपर्टीज' चालवते. 'क्लाउडफेअर'ची उपकरणे व्यवसाय, गैर-सरकारी संस्था (NGOs), ब्लॉगर्स आणि ऑनलाइन उपस्थिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जलद आणि अधिक सुरक्षित वेबसाइट्स आणि ॲप्स चालवण्यासाठी मदत करतात. त्यांचे काम बहुतेक वेळा कोणाच्या लक्षात येत नाही, परंतु जेव्हा असा तांत्रिक बिघाड होतो, तेव्हा लगेचच त्यांच्या अनुपस्थितीची मोठी समस्या जाणवते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world