Noshir Gowadia : अमेरिकेने दीर्घ हवाई प्रवास करत इराणच्या अनुस्थळांवर अचूक हल्लाबोल केला. मध्यरात्री अमेरिकेच्या हल्ल्याने इराणची झोप उडाली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण अक्षरश: हादरला. अमेरिकेची हवाई ताकद असलेल्या B2 बॉम्बर विमानामुळे हे शक्य झालं. अमेरिकेने बी-2 बॉम्बरच्या माध्यमातून जगाला आपली हवाई ताकद दाखवली. मात्र बी-२ स्टेल्थ बॉम्बरच्या निर्मितीत मुंबईकर असलेल्या इंजिनिअर नोशीर गोवाडिया यांचं योगदान देखील महत्त्वाचं आहे.
बी-२ स्पिरिट हा एक अत्याधुनिक स्टेल्थ बॉम्बर आहे, जो रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शनला चकवण्यास सक्षम ठेवतो. गोवाडिया यांनी बी-2 च्या संपूर्ण प्रोपल्शन सिस्टमचे संकल्पनात्मक डिझाइन केले. ही यंत्रणा विमानाला शक्ती प्रदान करते आणि त्याची कार्यक्षमता वाढवते. या प्रणालीमुळे विमान कमी उष्णता उत्सर्जित करते, ज्यामुळे इन्फ्रारेड सेन्सर्सना त्याचा मागोवा घेणे कठीण होते.
गोवाडिया यांनी बी-2 च्या स्टेल्थ इन्फ्रारेड सप्रेशन तंत्रज्ञानावर काम केले. यामुळे विमान रडार आणि इन्फ्रारेड सिस्टम्सद्वारे शोधले जाण्यापासून संरक्षित राहते. विमानाच्या एक्झॉस्ट सिस्टमचे डिझाइन असे केले आहे ज्यामुळे उष्णता कमी करून विमानाला रडारवर एकप्रकारे अदृश्य बनवते. गोवाडिया हे बी-2 च्या प्रमुख डिझायनरपैकी एक होते.
(नक्की वाचा- इराणला हादरवणारं 'B-2 Bomber'; विमानाची किंमत आणि ताकद पाहून थक्का व्हाल!)
चीनला तंत्रज्ञान विकल्याचा आरोप
अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीनंतरही गोवाडिया सध्या फ्लॉरेन्स येथील तुरुंगात आहेत. 2005 मध्ये गुप्तचर आणि गोपनीय माहिती इतर देशांना विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गोवाडिया यांनी 1999 मध्ये नॉर्थरॉप सोडल्यानंतर स्वतःची कंपनी स्थापन केली.
2003 ते 2005 या काळात त्यांनी चीन, इस्रायल, जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांना बी-2 च्या स्टेल्थ तंत्रज्ञानाशी संबंधित गोपनीय माहिती विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषतः त्यांनी चीनला स्टेल्थ क्रूझ मिसाइलसाठी एक्झॉस्ट नोझल डिझाइन करण्यात मदत केली, ज्यामुळे मिसाइल रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शनपासून वाचू शकते.
(नक्की वाचा- Iran Israel War: 'हा' देश इराणला अण्वस्त्रे देणार? युद्ध भडकणार, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?)
32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
गोवाडिया यांनी दिलेल्या माहितीमुळे चीनच्या स्टेल्थ तंत्रज्ञानात प्रगती झाल्याचा दावा केला जातो. चीनच्या जे-20 स्टेल्थ फायटर आणि एच-20 स्टेल्थ बॉम्बरच्या विकासात त्यांच्या माहितीचा उपयोग झाला असावा, असे मानले जाते. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला.
या आरोपांखाली गोवाडिया यांना २००५ मध्ये अटक करण्यात आली. 2010 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर 2011 रोजी त्यांना 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.