जाहिरात

Pakistan Train Hijack : रेल्वे हायजॅक प्रकरणात पाकिस्तान सरकार खोटं बोललं? 214 जणांचा गमावला जीव?

पाकिस्तानमध्ये मंगळवारी (11 मार्च) क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक झाली होती. पाकिस्तान सरकारनं या प्रकरणात दिलेल्या माहितीवर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

Pakistan Train Hijack : रेल्वे हायजॅक प्रकरणात पाकिस्तान सरकार खोटं बोललं? 214 जणांचा गमावला जीव?
मुंबई:

हेमाली मोहिते, प्रतिनिधी

पाकिस्तानमध्ये मंगळवारी (11 मार्च) क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक झाली होती. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मी (Baloch Liberation Army ) या घटनेची जबाबदारी तात्काळ स्विकारली. त्यांनी 100 पेक्षा जास्त प्रवासी ओलिस ठेवले होते. या प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तान लष्करानं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. पाकिस्तान सरकारनं या प्रकरणात दिलेल्या माहितीवर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होता दावा?

पाकिस्तान सरकारनं केलेल्या दाव्यानुसार, जाफर एक्स्प्रेसला सोडवण्यासाठीचं ऑपरेशन 30 तास चाललं. सैन्यानं 33 बंडखोरांना ठार केले. 21 प्रवासी आधीच ठार झाले होते. सैन्याचे चार जवान शहिद झाले. बंडखोरांनी प्रवाशांचा मानवी सुरक्षा कवच म्हणून वापर केला. 

पाकिस्ताननं या प्रकरणात अफगाणिस्तानला दोषी ठरवलंय. अफगाणिस्तानं बंडखोरांना त्यांच्या भूमीचा वापर करू देऊ नये असा इशारा पाकिस्ताननं दिलाय. पाकिस्तानी गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्ताननंच या कटाला पैसा पुरवला असा आरोप केला जात आहे. इतकंच नाही तर या ऑपरेशनसाठी भारतानंही पैसा पुरवल्याचा बिनबुडाचा आरोपही पाकिस्ताननं करून टाकला.

( नक्की वाचा : Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का? )
 

पाकिस्तान सरकार खोटं बोललं?

पाकिस्तान सरकारचा हा संपूर्ण दावा बलोच लिबरेशन आर्मीनं फेटाळला.  त्यांनी या प्रकरणात निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यामधून पाकिस्तान सरकारच्या संपूर्ण निवेदनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीएलएनं या ऑपरेशनला दारा-ए-बोलान युद्ध असं नाव दिलंय. तसंच अपहरणादरम्यान नेमकं काय झालं याची माहितीही या निवेदनाद्वारे जारी केलीय.

'पाकिस्तानी सैन्याला अल्टीमेटम देऊनही त्यांनी ते पाळलं नाही. आम्ही पाकिस्तान सरकारला 48 तासांची मुदत दिली होती. त्यांच्या जवानांचे प्राण वाचवण्याची आम्ही संधी दिली होती. मात्र पाकिस्तानचा पारंपरीक हट्टीपणा आणि लष्करी अहंकार आड आला. त्यांनी या प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं नाही.त्यांच्या हट्टीपणामुळेच आम्हाला सर्व 214 ओलिसांना फाशी द्यावी लागलीय,' असं निवेदन बलोच लिबरेशन आर्मीनं प्रसिद्ध केलं आहे. 

बीएलएनं या ऑपरेशनला दारा-ए-बोलान युद्ध असं नाव दिलंय. तसंच अपहरणादरम्यान नेमकं काय झालं याची माहितीही या निवेदनाद्वारे जारी केलीय. बंडखोरांनी ओलिसांना आणि पाकिस्तानी राज्य सैनिकांनाही ठार मारलं तसंच स्वतःलाही ठार केलं. ते शहीद झाले असाही दावा बीएलएनं केलाय.

( नक्की वाचा : Hijacked train: 'ट्रेन जशी थांबली...' पाकिस्तानमधल्या हायजॅक ट्रेनची अंगावर काटा आणणारी इनसाईड स्टोरी )
 

या युद्धात पाकिस्तानी एसएसजी कमांडोंची झरार कंपनीनं आमच्या फिदायीनना घेरलं. त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. ही लढाई अनेक तास चालली. त्यात कमांडोंनाही नुकसान सहन करावं लागलं. अपहरणकर्त्यांनाही मृत्यूदंड दिला. फिदायीन शेवटपर्यंत लढले आणि स्वतःवर गोळी झाडून शहीद झाले, असा बीएलएचा दावा आहे. 

लढाईचं हे वर्णन करताना बीएलएनं पाकिस्तानवर मोठा आरोप केलाय. मृत बंडखोरांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते जगाला दाखवत पाकिस्तानी सरकार स्वतःचं अपयश लपवत आहेत. ज्या ओलिसांना सोडवल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय त्या ओलिसांना आम्ही वाटाघाटींचा प्रयत्न म्हणून कायद्यानुसार आधीच सोडलं होतं, असाही त्यांनी दावा केलाय. 

पाकिस्तानवर तोंड लपवण्याची वेळ!

हे सारं निवेदन समोर आल्यानंतर आता पाकिस्तानवर तोंड लपवण्याची वेळ आलीय.कारण ट्रेनला कमांडोंनी घेराव घातल्याचा, हवेतून हेलिकॉप्टरनं कारवाई सुरू असल्याचा व्हिडिओ तर जगासमोर आणला. मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या कोणत्याही कारवाईचा पुरावा पाकिस्ताननं दिला नाही. त्या उलट हे सगळं कारस्थान भारत आणि अफगाणिस्तानचं असल्याचं सांगत पाकिस्ताननं आपली जबाबदारी साफ झटकलीय.

बलुचिस्तानच्या नेत्यांना पाकिस्तानी तुरुंगात डांबलंय आणि त्यांना सोडवण्यात यावं यासाठी हा ट्रेन हायजॅकचा ड्रामा रंगला होता. मात्र अपहरणकर्त्यांशी पाकिस्ताननं खरंच बोलणी केली का की थेट रेस्क्यू ऑपरेशन राबवून सगळ्यांचाच जीव संकटात टाकला असा प्रश्न उपस्थित होत आहे. बलोचिस्तानचा हा लढा तसा जुनाच आहे. अगदी भारत पाकिस्तान फाळणीपासूनचा

स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढा

बलुचिस्तानचा लढा हा भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीपासूनचा आहे. फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करण्यात येते. बलोच समाजाचा पाकिस्तानात समाविष्ट होण्यास विरोध होता. आपल्याला जबरदस्तीने पाकिस्तानमध्ये समाविष्ट केलं असा त्यांचा आरोप आहे. 

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी बलोच लिबरेशन आर्मी सर्वात मजबूत संघटना आहे. या संघटनेला 2007 साली दहशवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलंय. 

बलुचिस्तान हा प्रदेशात तांबं, सोनं, कोळसा, युरेनियमचा साठा आहे. यामध्ये 40 कोटी टन सोनं आहे.या खनिजांवर चीनचं लक्ष आहे. खनिजांचा हा खजिना पाकिस्तान चीनला देत आहे असा बलोच लिबरेशन आर्मीचा आरोप आहे. पाकिस्तान-चीन करारातून बलुचिस्तानची सुटका करण्याचं त्यांचं ध्येय आहे. 

त्यामुळेच पाकिस्तानसह चीनवरही बलुचिस्तानच्या नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे बीएलएसारख्या संघटना पाकिस्तानसह चीनला लक्ष्य करत आहेत. तर चीनकडून मिळणारं आर्थिक, लष्करी साह्य वाचवायचं असेल तर बलुचिस्तानची गळचेपी करण्याचा मार्ग आतापर्यंत पाकिस्ताननं अवलंबला आहे. बलोच संघटनांच्या सदस्यांना अटक करणं, त्यांना गायब करणं अशा उद्योगांमधूनच पाकिस्तान चीनला सुरक्षेची हमी देण्याचा प्रयत्न करत आलाय. असा पाकिस्तानवर आरोप आहे. 

पाकिस्तान सरकार आणि बलोच लिबरेशन आर्मीकडून दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पण, त्यामध्ये 214 जणांचा हकनाक बळी गेला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: