- पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये पाक सैन्याने बेछूट गोळीबार केला असून ३० हून अधिक नागरिकांना ठार केले
- जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने ९ जूनला लाँग मार्च आयोजित केला होता
- JAAC या नागरी हक्क संघटनेला पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटना घोषित केले आहे
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (PoK) सध्या पाक सैन्याने दहशत माजवली आहे. इथे मानवाधिकार आणि मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्यांना यमसदमी धाडलं जात आहे. POK मध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले जात होते. मात्र इथल्या नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने बेछूट गोळीबार केला आहे. हा गोळीबार करताना त्यांनी कसला ही विचार केला नाही. लष्कराच्या या निर्दयी कारवाईत आतापर्यंत 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने (JAAC) 9 जून रोजी लाँग मार्च आयोजित केला होता. त्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. मात्र त्यांच्या विरोधात हिंसक कारवाई करण्यात आली. PoK मधील सर्वात मोठी नागरी हक्क संघटना म्हणून 'JAAC' ची ओळख आहे. तिथल्या लोकांच्या हक्कासाठी ही संघटना लढते. मात्र पाकिस्तानच्या सरकारने या संघटनेला थेट 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले आहे. शिवाय त्यांच्यावर बंदी ही घातली आहे.
ही संघटना वेगवेगळ्या प्रश्नासाठी लढत आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून वीज, गव्हावरील सबसिडी आणि मूलभूत हक्कांसाठी आंदोलन करत आहे. 9 जूनला या प्रश्नी त्यांनी पुन्हा मोर्च्याचे आयोजन केले होते. मात्र मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाने 5 जूनच्या रात्रीपासूनच संपूर्ण PoK मधील इंटरनेट सेवा खंडित केली होती. शिवाय पीओकेमध्ये जाण्यास अनेकांना रोखण्यात आले होते. खास करून पर्यटकांसाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या.
पीओकेमधील रावलकोट हे सध्या या आंदोलनाचे मुख्य केंद्र आहे. मोठ्या संख्येने या संघटनेला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार याची कल्पना शाहबाज शरीफ सरकारला होती. शिवाय लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ही याचा अंदाज आला होता. त्यामुळे आधीच 5 जून ते 20 जून दरम्यान पर्यटकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी लागू करण्यात आली होती. पर्यटकांना PoK मध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. पाकिस्तान सरकार येथील नैसर्गिक संसाधनांचा वापर करते, परंतु स्थानिक जनतेला मात्र दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. 2023 मध्येही अशाच आंदोलनादरम्यान पाक सैन्याने केलेल्या बळाचा वापरामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world