अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिका आणि पक्षाच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला, असं बायडेन यांनी स्पष्ट केलं.
येत्या चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (US presidential election) होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये झालेल्या वादविवादादरम्यानही बायडेन यांना आपली भूमिका ठोसपणे मांडता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बायडेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या संसर्गामुळे श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचंही दिसलं होतं. याचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले होते.
त्यामुळे बायडेन यांनी माघार घ्यावी यासाठी डेमोक्रॅट्स पक्षातून प्रयत्न केले जात होते. अखेर आता बायडेन यांनीच निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘अमेरिकेसारख्या बलशाही देशाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणं हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण आहे असं बायडेन यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची माझी इच्छा आणि तयारी होती. पण देशाचं आणि डेमोक्रॅट्स पक्षाचं हित लक्षात घेऊन मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित काळ मी माझे कर्तव्य पार पाडेन, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
— Joe Biden (@JoeBiden) July 21, 2024
जो बायडेन यांच्या माघारीनंतर विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यासह अनेक इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world