सूरज कसबे, अजिंक्य धायगुडे, प्रतिनिधी
Pune Hotels Shut Down : ढोकळा, पुडाची वडी, सुरळीवडी, मटार करंजी, व्हेज पॅटीस, सामोसा, कचोरी, मटार चीज बॉल, अळूवडी....जिभेचे चोचले पुरवणारे हे पुण्याच्या एका प्रसिद्ध दुकानातले पदार्थ. पण आता हे पदार्थ पुढचे काही दिवस चित्रातच पाहावे लागणार की काय, अशी परिस्थिती आहे. कारण अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपला आहे. युद्धामुळे पुण्यातल्या हॉटेल्सना एलपीजी गॅस मिळत नाहीय. परिणामी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलीय.
पुण्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय. शहरातल्या एकाही गॅस केंद्रावर व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाही. ज्या व्यावसायिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सिलिंडर घेऊन ठेवले होते, त्यांची सोय होऊ शकते. मात्र सध्या नव्या सिलिंडरची मागणी पूर्ण होणार नाही. या सगळ्यामुळे पुण्यातल्या हॉटेल व्यवसायिकांचे दोन दिवसांपासून मोठं नुकसान होतंय. मोठमोठ्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. हॉटेलमधले मेन्यू कमी होतील. येत्या दोन दिवसांत ८५ टक्के हॉटेल बंद होण्याची भीती आहे.
पुढच्या दोन दिवसांत अनेक हॉटेल्स बंद होण्याची भीती
अनेक हॉटेल्समध्ये गॅस नसल्याने चुलीवर अन्न शिजवलं जातंय. मात्र त्यामध्ये वेळ जातोय आणि ग्राहकांना वेळेवर सेवा देता येत नाही. व्यावसायिक गॅसचा पुरवठा पुण्यात बंद असल्याने दोन दिवसांत हॉटेल व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. पुढच्या दोन दिवसांत अनेक हॉटेल्स बंद करावी लागतील, अशी परिस्थिती आहे. सध्या पुण्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला असून फक्त घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या तरी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.
लोणावळ्यातही पर्यटकांसमोर मोठी अडचण
दुसरीकडे पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यातही व्यावसायिकांना गॅस मिळत नाही. संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक हॉटेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक उपकरणांच्या मदतीनं जेवण बनवण्याची तयारी करण्यात आली. पुणे शहरात एकूण १६ लाख एलपीजी गॅसचे ग्राहक आहेत. तर पुणे जिल्ह्यात एकूण २८ लाख एलपीजी ग्राहक आहेत. त्यापैकी २४ लाख घरगुती तर ४ लाख व्यावसायिक एलपीजी कनेक्शन्स आहेत. सध्याच्या परिस्थितीत घरगुती आणि व्यावसायिक मिळून १ लाख एलपीजी सिलिंडरचा तुटवडा आहे. टंचाईच्या काळात प्रत्येक वितरकाकडे ३,००० ते ६,००० बुकिंग होतं. व्यावसायिक वापरासाठीचं एलपीजी गॅस वितरण पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे.
४-५ दिवस पुरेल इतकाच गॅससाठा...
हॉटेल व्यवसायाबरोबरच लघुउद्योगांवरही युद्धाचे परिणाम दिसू लागलेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातल्या जवळपास साडेसात हजार कंपन्या संकटात सापडल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १५ हजार लघुउद्योग आहेत. त्यापैकी जवळपास साडे सात हजार कंपन्यांना गॅस टंचाईची झळ बसतेय. अनेक कंपन्यांकडचा गॅससाठा संपलाय. इतर कंपन्यांकडे अवघे ४-५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. कंपनीची महिन्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे.
विद्यार्थी आणि नोकरदारवर्गावर मोठं संकट...
इराण-इस्रायल युद्धाचा सगळ्यात मोठा फटका हॉटेल व्यवसाय आणि उद्योगांना बसला आहे. पुण्यात पोळी-भाजी केंद्रांपासून ते फाईव्हस्टार हॉटेल्सची संख्या मोठी आहे. पुणे शिक्षण आणि आयटी हब असल्यानं अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्यातल्या हॉटेलमध्येच भूक भागवतात. मात्र युद्धाची झळ बसल्यानं हॉटेल्सचंही मोठं नुकसान होतंय आणि अनेक पुणेकरांनाही भूक भागवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची शोधाशोध करावी लागणार आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world