आखाती देशांतील 40 दिवसांच्या भीषण युद्धानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असला, तरी होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) अडकलेल्या 20 हजार हून अधिक नाविकांची सुटका झालेली नाही. या अरुंद जलमार्गात सध्या 2000 हून अधिक मालवाहू जहाजांची कोंडी झाली असून, तेथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीसह मृत्यूचे सावट पसरले आहे.
अन्नासाठी वणवण आणि पाण्याचा टंचाई
गेल्या अनेक महिन्यांपासून या सामुद्रधुनीत जहाजे अडकून पडली आहेत. जहाजांवरील अन्नाचा साठा आणि पिण्याच्या पाण्याचा साठा आता संपुष्टात आला आहे. अडकलेल्या जहाजांमधून सातत्याने मदतीसाठी आपत्कालीन संदेश पाठवले जात आहेत. मात्र, अद्याप कोणतीही 'सप्लाय बोट' या जहाजांपर्यंत पोहोचू शकलेली नाही.
'डेथ झोन' बनली होर्मुजची सामुद्रधुनी
सीजफायर होऊनही जहाजे का हलत नाहीत, यामागे काही गंभीर कारणे आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम अत्यंत नाजूक आहे. कोणत्याही क्षणी पुन्हा मिसाइल किंवा ड्रोन हल्ला होईल. या भीतीने जहाजांच्या कॅप्टन्सनी आपल्या कंपन्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, ही धोकादायक सामुद्रधुनी ओलांडून ते आपला किंवा आपल्या खलाशांचा जीव धोक्यात घालणार नाहीत.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: "...तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा," हायकोर्टाने राज्य सरकारला झापले)
सर्वात मोठी भीती ही आहे की, जर त्यांनी युद्धविरामावर विश्वास ठेवून आपली जहाजे आखातात पाठवली आणि अचानक पुन्हा युद्ध सुरू झाले, तर त्यांची जहाजे आणि त्यावरील खलाशी दोघेही कायमचे अडकून पडतील. एका जहाजाचे नुकसान म्हणजे अब्जावधींचे नुकसान, जे सहन करण्याची कोणत्याही जहाज वाहतूक कंपनीची क्षमता नाही.
इराणने होर्मुज पुन्हा बंद केल्याच्या बातम्या इराणी माध्यमांतून येत असल्याने संभ्रम वाढला आहे. जागतिक विमा कंपन्यांनी या जहाजांना सुरक्षा कवच देण्यास नकार दिला आहे. विम्याशिवाय कोणताही कॅप्टन जहाज धोक्यात घालण्यास तयार नाही.
सीजफायरचा गोंधळ आणि लेबनान कनेक्शन
इराणने सीजफायरसाठी घातलेली मुख्य अट म्हणजे 'लेबनानवर हल्ला न करणे' ही होती. मात्र, इस्रायलने लेबनानवरील हल्ले उलट अधिक तीव्र केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलचा दावा आहे की लेबनानचा विषय करारात नव्हताच. यामुळे इराण संतप्त झाला असून, पुढील काही तास युद्धाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात आहेत.
(नक्की वाचा- Pune Railway News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे स्टेशन)
भविष्यातील संकटाची चाहूल
इस्लामाबाद येथे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वॅन्स (JD Vance) आणि इराण यांच्यात शांतता वार्ता होणार आहे. मात्र, जरी ही चर्चा यशस्वी झाली तरी होर्मुजमधील 'ट्रॅफिक जॅम' संपवण्यासाठी अनेक महिने लागतील. त्यातच इराणने आता या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून मोठा टोल वसूल करण्याची तयारी सुरू केल्याने जागतिक महागाई वाढण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world