Iran War: इराण-अमेरिका युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट; ट्र्म्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात आनंद!

US-Iran War Update: अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या करारानुसार, जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) पुन्हा खुला केला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शांतता करार पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा सागरी मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला होणार असून, अमेरिकेने इराणवर केलेली नौदलाची नाकेबंदी तात्काळ हटवली जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत या करारावर शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांनी लिहिले, "इराणसोबतचा करार पूर्ण झाला आहे. यामध्ये सामील असलेल्या सर्वांचे अभिनंदन! मी याद्वारे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' कोणत्याही शुल्काशिवाय पूर्णपणे उघडण्याची घोषणा करत आहे. यासोबतच, अमेरिकन नौदलाची नाकेबंदी तात्काळ मागे घेण्याचे आदेश देत आहे. जगातील जहाजांनो, आता तुमची इंजिन सुरू करा. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू होऊ द्या!"

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांची मध्यस्थी

अमेरिका आणि इराण या दोन कट्टर शत्रू देशांना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थाची मोठी भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही वेळातच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी 'X' वर पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला.

पंतप्रधान शरीफ यांनी लिहिले की, "अत्यंत सखोल आणि प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. दोन्ही देश लेबनॉनसह सर्वच आघाड्यांवर लष्करी कारवाया तातडीने आणि कायमच्या थांबवण्यास तयार झाले आहेत." या ऐतिहासिक करारावर येत्या शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अधिकृत स्वाक्षरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

'स्ट्रेट ऑफ होर्मुज'चे जागतिक महत्त्व

जगातील एकूण कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी जवळपास 20% भाग याच मार्गावरून जातो. 28 फेब्रुवारी 2026 रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने हा जलमार्ग पूर्णपणे बंद केला होता. एप्रिल 2026 मध्ये पाकिस्तानमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांना नौदलाने घेरले होते. मार्ग मोकळा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता आहे.

इराणच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

अध्यक्ष ट्रम्प आणि पाकिस्तानने कराराची घोषणा केली असली, तरी इराणच्या बाजूने अद्याप अधिकृत आणि सविस्तर वक्तव्य समोर आलेले नाही. सुरुवातीला इराणने पाकिस्तानच्या काही दाव्यांवर आक्षेप घेतला होता, ज्यामुळे हा करार किती मजबूत आहे, याबाबत तज्ज्ञांमध्ये काहीसे प्रश्नचिन्ह आहे. या कराराचे संपूर्ण तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, हा मार्ग नेमका कोणत्या दिवसापासून जहाजांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि खुला होईल, याकडे आता संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article