गेल्या अनेक महिन्यांपासून 'मिडिल ईस्ट'मध्ये सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात एक व्यापक शांतता करार पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा ऐतिहासिक करार अंतिम होताच, आंतरराष्ट्रीय खनिज तेल आणि वायू वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेला 'होर्मुझ स्ट्रेट' (Strait of Hormuz) पुन्हा खुला केला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर पोस्ट लिहून याची माहिती दिली. "कराराबाबतच्या जवळपास सर्व महत्त्वाच्या बाबी पूर्ण झाल्या असून, आता केवळ काही अंतिम मुद्द्यांवर चर्चा करणे बाकी आहे," असे त्यांनी नमूद केले आहे.
व्हाइट हाउसच्या 'ओवल ऑफिस'मध्ये चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, या कराराला अंतिम रूप देण्यासाठी त्यांची इतर इस्लामिक आणि आखाती देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी अतिशय सविस्तर आणि यशस्वी चर्चा झाली आहे. ट्रम्प यांनी लिहिले की, "मी सध्या व्हाइट हाउसच्या ओवल ऑफिसमध्ये आहे. येथे सौदी अरेबियाचे मोहम्मद बिन सलमान अल सऊद, युएई (UAE) चे मोहम्मद बिन झायद अल नाहयान, कतरचे अमीर तमीम बिन हमद आणि कतरचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान, पाकिस्तानचे फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर अहमद शाह, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी, जॉर्डनचे किंग अब्दुल्ला II आणि बहरीनचे किंग हमद बिन इसा अल खलीफा यांच्यासोबत 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान' आणि 'PEACE' (शांतता) संबंधित सामंजस्य करारावर सकारात्मक चर्चा झाली आहे."
(नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

यासोबतच, ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशीही फोनवर चर्चा केली असून, कराराच्या शेवटच्या तपशिलांवर सध्या काम सुरू असल्याचे सांगितले आणि लवकरच या कराराची अधिकृत घोषणा केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इराणची भूमिका
दुसरीकडे, इराणचे प्रवक्ते इस्माईल बाघई यांनीही शनिवारी या संभाव्य शांतता कराराबाबत इराणची बाजू मांडली. इराणने या करारासाठी 14 मुद्द्यांचा एक विशेष मसुदा तयार केला. हा मसुदा पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील 30 ते 60 दिवसांच्या आत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी या मसुद्यावर पुढील बोलणी केली जात आहे.
(नक्की वाचा- Rain Alert: कोकणात मेघगर्जनेसह पावसाची अंदाज, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा)
आम्ही खूप दूरही आहोत आणि खूप जवळही!
कराराच्या सद्यस्थितीवर बोलताना इराणचे प्रवक्ते इस्माईल बाघई पुढे म्हणाले की, "आम्ही या कराराच्या खूप जवळही आहोत आणि त्याच वेळी खूप दूरही आहोत. याचे कारण म्हणजे भूतकाळात आम्हाला अमेरिकेच्या परस्परविरोधी विधानांचा आणि बदलत्या भूमिकेचा वाईट अनुभव आला आहे. अमेरिकेने अनेकदा आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळे ते पुन्हा आपले मत बदलणार नाहीत, याविषयी आम्ही पूर्णपणे बेफिकीर राहू शकत नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world