जाहिरात

US-Iran War : युद्ध थांबलंय, पुढे काय? 14 दिवसांनंतर काय होणार? इराणच्या 10 अटींमुळे निर्माण झालेत 10 प्रश्न

तूर्तास अमेरिका- इस्त्रायल- इराण युद्ध थांबलंय. मात्र या युद्धविरामासाठी ठेवलेली प्रत्येक अट म्हणजे युद्धविरामाचा खडतर मार्ग आहे.

US-Iran War : युद्ध थांबलंय, पुढे काय? 14 दिवसांनंतर काय होणार? इराणच्या 10 अटींमुळे निर्माण झालेत 10 प्रश्न

US-Iran War : अमेरिका आणि इराण अखेर 40 दिवसानंतर दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी तयार झाले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये युद्धाविरामाच्या अटींवर चर्चा होईल. इराणने अमेरिकेसमोर युद्धविरामाच्या दहा अटींचा प्रस्ताव ठेवला आहे. इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने युद्धविराम आमच्या अटींवर झाल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या 10 अटींवर चर्चा करण्याची तयारी दाखवली. पुढील दोन आठवडे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करणार नाहीत. ही आखाती देशांसह जगासाठी सकारात्मक बातमी असली तरीही 14 दिवसांनंतर काय होणार ? या प्रश्नाची चिंता सगळ्यांना सतावतेय. इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या 10 अटी अमेरिका मान्य करणार का? इराणच्या प्रत्येक अटीवर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार यावर युद्धाचं भविष्य ठरणार आहे.  

युद्ध आता थांबलं, १४ दिवसांनंतर काय होणार?

प्रश्न क्रमांक १

अमेरिका आणि इस्त्रायलवरचे हल्ले पूर्णपणे थांबवणार ? 

अमेरिका युद्धविरामाच्या चर्चेसाठी तयार झाली आहे. इराणच्या 10 अटींवर चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तरीही अमेरिका आपल्या शब्दावर ठाम राहिल का याबाबत सर्वांनाच शंका आहे. याला कारणही तसंच आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर अचानक हल्ले केले. या हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये युरेनियम निर्मितीवर निर्बंधाबाबत चर्चा सुरू होती. ओमानच्या मध्यस्थीने दोन्ही देश सकारात्मक चर्चा करत होते. मात्र अचानक ट्रम्प आणि नेतान्याहूंनी इराणवर हल्ल्याचा प्लान आखला आणि जगाला आणखी एका युद्धाच्या खाईत लोटलं. त्यामुळे अमेरिका इराणवरचे हल्ले थांबवणार का? या प्रश्नाचं उत्तर डोनाल्ड ट्रम्प वगळता जगातला दुसरा कोणताही माणूस देऊ शकत नाही.


प्रश्न क्रमांक २ 

इराणवरचे सर्व आर्थिक निर्बंध हटवले जाणार का ? 

प्रश्न क्रमांक 3

होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण काय राहणार का ? 


हे दोन प्रश्न इराणच्या आर्थिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. कारण अमेरिकेच्या दबावानंतर युरोपीय राष्ट्रांनी इराणवर आर्थिक निर्बंध लादले. तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर इराणच्या अर्थव्यवस्थेची मदार आहे. युरोपीय राष्ट्रांसोबत व्यवहार थांबल्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अर्थात या काळात चीनने इराणकडून तेलनिर्यात करून मोठा आधार दिलाच. तरीही डॉलरमध्ये होणारा व्यवहार इराणसाठी अधिक फायदेशीर ठरत होता. याशिवाय होर्मुझ खाडीवरच नियंत्रण ही इराणची सर्वात मजबूत बाजू ठरली. होर्मुझच्या खाडीमुळे इराणसमोर एक संरक्षण भिंत उभी राहिली. युद्धापूर्वी हा मार्ग संपूर्ण जगासाठी खुला होता. पण युद्धानंतर या भागावर फक्त इराणचं नियंत्रण आहे. म्हणजेच भविष्यातही इथून जाणारी जहाज इराणच्या परवानगीने आणि इराणच्या संरक्षणातच सुरक्षित बाहेर  पडणार आहेत.


प्रश्न क्रमांक 4 

इराणला युरेनियन संवर्धनाची परवानगी मिळणार का ? 


प्रश्न क्रमांक 5

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) इराणविरोधातले सर्व प्रस्ताव रद्द करणार का ? 

मुळात या युद्धाची सुरुवातच या प्रश्नावरून झाली होती. इराण अणुनिर्मिती करतोय? आणि इराणला यापासून रोखलं पाहिजे. यासाठीच हे युद्ध पेटलं. इराणने सतत आपल्याकडे अणुशस्त्र नसल्याचं सांगितलं. आमचा अणु कार्यक्रम हा वीज निर्मिती, कृषी आणि मेडिकल रिसर्चसाठी असल्याचं इराणने सांगितलं. मात्र इराणला अणुनिर्मिती करण्यात यश मिळालं तर इस्त्रायल आणि अमेरिकेलाच सर्वात मोठा धोका असेल असा कांगावा इस्त्रायलने केला. डोनाल्ड ट्रम्पदेखील नेतान्याहूंनी रचलेल्या सापळ्यात अडकले. अखेर युद्धाचा भडका उडाला आणि सलग 40 दिवस हे युद्ध धगधगत राहिलं. आता युद्धविरामाच्या चर्चेसाठी इराणने युरेनियम निर्मिती सुरू ठेवण्याची मुख्य अट ठेवलीय. मात्र डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अणुनिर्मितीच्या तळांवर ताबा मिळवण्याची भाषा करतायत. 

नक्की वाचा - Who are Bohra Muslims? : बोहरा मुस्लीम कोण आहेत? इतर मुस्लीम अन् बोहरांमध्ये फरक काय? खतना प्रथा काय आहे?

प्रश्न क्रमांक 6

अमेरिकीचं सैन्य पश्चिम आशियामधून बाहेर पडणार ? 

पश्चिम आशिया आणि आखातातील देशांमध्ये अमेरिकेचे सैन्य तळ आहेत. या सैन्यतळांवर अमेरिका इराणविरोधात कारवाया करतो. आता इराणकडून हे तळ बंद करून सैन्य माघारी बोलावण्याची मागणी केली जात आहे. 
मात्र ट्रम्प आखातातील लष्करी तळ बंद करण्याचा निर्णय घेणं जवळपास अशक्य मानलं जातंय.   

प्रश्न क्रमांक 7

अमेरिका इराणला युद्धातील नुकसान भरपाई देणार ? 

प्रश्न क्रमांक 8

अमेरिका जागतिक संस्थांमध्ये थांबवलेला इराणचा फंड पुन्हा सुरू करणार ? 

अमेरिकेने इराणसोबत युद्धबंदीचा पहिला प्रस्ताव ठेवला. त्यामुळे इराण युद्धबंदी फक्त आमच्याच अटींवर होईल यावर ठाम आहे. या अटींमध्ये नुकसान भरपाई हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिकने युद्धातील नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प ही अट मान्य करतील का? कारण असं करणं म्हणजे इराणसमोर शरणागती पत्करण्यासारखंच आहे. दुसरीकडे अमेरिकेलाही या युद्धाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलंय. त्यामुळे इराणची नुकसान भरपाईची अट या चर्चेतील कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

प्रश्न क्रमांक 9

संयुक्त राष्ट्र परिषदेत इराणविरोधातील सर्व प्रस्ताव रद्द केले जाणार ? 

प्रश्न क्रमांक 10

इराण समर्थक हिजबुल्लाह, हुती, हमास संघटनांवर कारवाई थांबणार ? 
 

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या ठिकाणांवर इस्त्रायलकडून हल्ले केले जात आहेत. गाझामध्येही हमास संघटनेने गुडघे टेकल्यानंतरही हल्ले सुरू आहेत. ट्रम्प यांनी हे हल्ले थांबवण्याची तयारी दाखवली तर नेतान्यांहूंची अडचण वाढू शकते. नेतान्याहूंनी ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र लेबनॉनमध्ये बंडखोर संघटनांवर हल्ले थांबवण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 

तूर्तास अमेरिका- इस्त्रायल- इराण युद्ध थांबलंय. मात्र या युद्धविरामासाठी ठेवलेली प्रत्येक अट म्हणजे युद्धविरामाचा खडतर मार्ग आहे. आता पुढच्या 14 दिवसात अमेरिका आणि इस्त्रायल हा मार्ग पार करणार का? याकडे जगाचं लक्ष असेल.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com