US Iran War Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणि शांतता कराराबाबत चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने इराणवर “सेल्फ-डिफेंस स्ट्राईक” म्हणजेच आत्मरक्षेसाठी मोठा लष्करी हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील शांतता प्रक्रिया आणि कराराच्या आशा पुन्हा एकदा धूसर झाल्या आहेत.
अमेरिकेने दावा केला आहे की, त्यांनी आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना आणि समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या इराणी बोटींना लक्ष्य केले आहे. दुसरीकडे, इराणच्या 'बंदर अब्बास' (Bandar Abbas) या किनारी भागात अनेक शक्तिशाली स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, त्यानंतर इराणने आपले एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय केले आहे.
अमेरिकन सेंट्रल कमांडने काय म्हटले?
अमेरिकी सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन लष्कराने सोमवारी इराणच्या मिसाईल लॉन्च साईट्स आणि 'होर्मुझ' (Strait of Hormuz) परिसराच्या आसपास उपस्थित असलेल्या संशयास्पद बोटींवर आत्मरक्षार्थ कारवाई केली.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
CNN च्या रिपोर्टनुसार, सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितले की, “अमेरिकी लष्कराने आज दक्षिण इराणमध्ये आत्मरक्षेसाठी हा हल्ला केला आहे, जेणेकरून इराणी सैन्याकडून आमच्या तैनात जवानांना असलेला मोठा धोका टळू शकेल. या हल्ल्याच्या लक्ष्यांमध्ये प्रामुख्याने मिसाईल लॉन्च साईट्स आणि समुद्रात घातक बारूदी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींचा समावेश होता. अमेरिकी सेंट्रल कमांड युद्धबंदीच्या काळात संयम बाळगत असले, तरी आपल्या सैनिकांच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर राहील.”
यापूर्वीही झाली होती चकमक
विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीलाही अमेरिकन लष्कराने इराणच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले होते. त्यावेळी होर्मुझ जलडमरूमध्यातून जाणाऱ्या अमेरिकन युद्धनौकांवर इराणकडून विनाकारण मिसाईल, ड्रोन आणि छोट्या बोटींद्वारे हल्ले करण्यात आले होते, ज्याला अमेरिकेने चोख प्रत्युत्तर दिले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world