अमेरिकेने इराणविरुद्धच्या आपल्या लष्करी कारवाया अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्याचा इशारा अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे. 'फॉक्स बिझनेस'च्या 'कुडलो' शोमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
'इराणला आजची रात्र खूप महागात पडणार'
स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेचे राष्ट्रपती आणि लष्करी नेतृत्वाच्या निर्णयानुसार आज रात्री इरेणच्या लष्करी क्षमतेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार केला जाईल. इराणचे मिसाईल लाँचर्स आणि क्षेपणास्त्रे तयार करणारे कारखाने यांना सर्वाधिक नुकसान पोहोचवण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. "आम्ही इराणची लष्करी क्षमता बऱ्याच अंशी कमी करत आहोत. आमची मोहीम अत्यंत प्रभावी ठरत आहे. इराणला आजची रात्र खूप महागात पडणार', असे बेसेंट यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
इराणला सध्या एकाच वेळी इस्रायल आणि अमेरिकेच्या आक्रमणाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणची आर्थिक आणि लष्करी बाजू पूर्णपणे कमकुवत करणे हा या मोहिमेचा मुख्य अजेंडा आहे.
भारतासाठी आनंदाची बातमी
इराणमधील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हे टाळण्यासाठी अमेरिकेने भारताबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. समुद्रात अडकलेले रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी वॉशिंग्टनने भारताला 30 दिवसांची विशेष सवलत दिली आहे. ट्रेझरी सचिव बेसेंट यांनी सुचवले की, अमेरिका रशियन तेलावर लादलेले आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत आहे. यामुळे बाजारात तेलाचा पुरवठा वाढून किमती नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
(नक्की वाचा- Shivneri Bus: मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)
तेल पुरवठा आणि जागतिक बाजारपेठ
प्रतिबंधित कच्च्या तेलाचे कोट्यवधी बॅरल्स सध्या समुद्रात आहेत. त्यावरचे निर्बंध हटवून ट्रेझरी विभाग पुरवठा वाढवू शकते आणि आम्ही सध्या त्याच दिशेने विचार करत आहोत," असे बेसेंट यांनी सांगितले. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशाला महागाईपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world