जाहिरात
5 minutes ago

काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस आज 6 नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी 1 वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला' उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा' होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत. 

पिंपरी चिंचवडमधील डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पिंपरी चिंचवड शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता दरम्यान ई-मेलद्वारे डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. डी वाय पाटील हॉस्पिटलला धमकी मिळाल्याचं कळताच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचं BDDS पथक आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले.  डी वाय पाटील हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये एका बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी अज्ञात व्यक्तीने ई-मेल द्वारे दिली आहे.  सध्या पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचा BDDS पथक आणि डॉग स्कॉड डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये कसून बॉम्ब सदृश्य वस्तूचा शोध घेत आहेत.

राहुल गांधी मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे नेते असले तरी त्यांचा देशाबद्दल अभ्यास नाही, प्रफुल पटेलांची टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये डाव्या विचारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या, असे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले होते. यावर राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना विचारले असता त्यांनी राहुल गांधींवर घणाघात केला. राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचे नेते असले तरी त्यांना आपल्या देशाबद्दल अभ्यास नाही. ज्यांना अभ्यास नसतो त्यांना यात्रा काढावी लागते, असा टोला यावेळी प्रफुल पटेल यांनी लगावला. तर काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांना देशाबद्दल पूर्ण अभ्यास आहे. 

राहुल गांधी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पोहोचले

राहुल गांधी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पोहोचले. तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला वंदन केले.  राहुल गांधी यांच्यासोबत मुकुल वासनिक, नाना पटोले, रमेश चेंनिथला, दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बारसू रिफायनरी रद्द करायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील - नितेश राणे

बारसू रिफायनरी रद्द करायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील. याच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ आणि जमीन मिळवण्यासाठी पत्र दिले होते. हा फक्त स्वतःची दलाली वाढवत आहे. उद्या कुणी 500 कोटी समोर ठेवले तर हा लाळ टपकत पहिली वीट लावण्यासाठी हा असेल, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरात आयकर विभागाची छापेमारी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरात आयकर विभागाची छापेमारी 

वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेती यांच्या घरी छापेमारी 

बाळासाहेब संचेती वैजापूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेचे संचालक आहेत

ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार दिनेश परदेशी यांचे निकटवर्तीय

सत्तेची चावी असलेल्या 7 स्विंग स्टेट्सचे कल आले समोर

सत्तेची चावी असलेल्या 7 स्विंग स्टेट्सचे कल आले समोर, 7 पैकी 5 स्विंग स्टेट्समधील कल समोर आले आहेत. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. 2 राज्यांमधील कल अद्याप समोर आलेले नाही.  

US Election 2024 : डोनाल्ड़ ट्रम्प 230 जागांवर तर कमला हॅरिस 205 जागांवर आघाडीवर

US Election 2024 : डोनाल्ड़ ट्रम्प 230 जागांवर तर कमला हॅरिस 205 जागांवर आघाडीवर आहेत. तासाभरापूर्वी कमला हॅरिस ट्रम्प यांच्या बऱ्याच मागे होत्या.  2020 मध्येही असेच काहीसे घडले होते. 

ट्रॅक्टरमधून पडून 50 वर्षीय महिलेचा मृत्यू, सोलापूर-धुळे मार्गावरील घटना

सोलापूर-धुळे महामार्गावरील तेरखेडा येथील उड्डाणपुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टरचे चाक आदळल्याने महिला खाली पडली. डोक्याला गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाला. ऊसतोड मजूर जालना जिल्ह्यातील टाकळी या गावातील असून कोल्हापूर जिल्ह्यात ते ऊस तोडणीसाठी जात असताना हा अपघात घडला. महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता महिला दगावल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे, त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये 'नो वॉटर - नो वोट' मोहीम! पाण्याच्या समस्येविरोधात नागरिक आक्रमक

अंबरनाथ पश्चिम भागात पटेल प्रयोशा गृहसंकुल असून तिथे 12 इमारतींमध्ये 1500 कुटुंबं वास्तव्याला आहेत. या संकुलात मागील 8 वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. याबाबत मागण्या, निवेदनं, आंदोलनं, नगरपालिकेवर मोर्चा असं सगळं काही करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता 'नो वॉटर नो वोट' असा नारा या संकुलातील रहिवाशांनी दिला आहे. याचा सर्वच पक्षाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. त्यामुळे नेतेमंडळींनी फोडलेल्या नारळातच पाणी येतं? की आता नळालाही पाणी येतं? हे पाहावं लागेल.

अब्दुल सत्तार यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याचा आरोप

सिल्लोड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याचा आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान यावर जिल्हा निवडणूक विभागाची प्रतिक्रिया आली असून, संबंधित व्यक्तीने अर्जाची छाननी झाल्यानंतर हा आक्षेप दाखल केला. आता त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर कार्यवाही शक्य नाही. छाननीपूर्वी आक्षेप आला तर तो वेबसाइटवर टाकला जातो, त्यामुळे सत्तार यांचा अर्ज वैध ठरवला. तसेच संबंधित अर्ज शपथपत्र स्वरूपात नसून तो अर्ज स्वरूपात आहे. त्यामुळे त्याबाबत कार्यवाही करता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र कटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: