जाहिरात

FYJC Admission Scandal : मार्क कितीही असो अ‍ॅडमिशन फिक्स, एका सीटसाठी किती पैसे घेतात माहिती आहे ?

FYJC Admission Racket: 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

FYJC Admission Scandal : मार्क कितीही असो अ‍ॅडमिशन फिक्स, एका सीटसाठी किती पैसे घेतात माहिती आहे ?
मुंबई:

मुंबईतील 11 वी प्रवेश प्रक्रिया (Mumbai College FYJC Admission) सुरू असतानाच आता यात मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. मंत्रालयातील शिक्षण विभागाचे काही अधिकारी 'अ‍ॅडमिशन माफियां' सोबत काम करत असून, एका प्रवेशासाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेत असल्याचा धक्कादायक दावा कोटेचा यांनी केला आहे.

मुंबईतील नामांकीत कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

मिहीर कोटेचा यांनी म्हटले की, त्यांच्या मतदारसंघात दोन नामांकित कॉलेज आहेत, जी मुंबईतील सर्वोत्कृष्ट कॉलेजपैकी आहेत. या कॉलेजच्या प्राध्यापकांना मंत्रालयातील अधिकारी फोन करतात. त्यांना धमकावले जाते की, आम्ही सांगितलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाच पाहिजे. जर असे केले नाही, तर 4-5 महिन्यांचे अनुदान काहीतरी त्रुटी काढून अडकवले जाते. हा प्रकार दरवर्षीचा असून, मंत्रालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी 'अॅडमिशन माफिया' सोबत काम करतात आणि एका प्रवेशासाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेतात, असे कोटेचा म्हणाले.

'अधिकारी रोज नोटीसा काढतो' आमदारांचा थेट आरोप

कोटेचा यांनी सांगितले की, हे अधिकारी रोज कॉलेजला नोटिसा काढतात. मी एकदा एका अधिकाऱ्याला फोन करून सांगितले की हा मुद्दा सभागृहात मांडणार आहे, तर त्याने तात्काळ प्राध्यापकाला सांगून संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करायला लावला. मात्र यावर्षी पुन्हा तेच प्रकार सुरू झाले आहेत असे कोटेचा यांनी म्हटले.

नाव उघड करण्याचा इशारा

यापुढे जर असा फोन आला, तर त्या अधिकाऱ्याचे नाव सभागृहात उघड करेन, असा इशारा आमदार मिहीर कोटेचा यांनी दिला आहे. यामुळे 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com