रेवती हिंगवे, पुणे
बेडशिट विक्रेत्याकडून हप्ता घेतल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस अंमलदार सुनिल कुसाळकर आणि संजय आसवले अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघांची विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात काहीजण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर व संजय आसवले तेथे आले. तुम्ही का थांबलात इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल. असे सांगून त्यांच्याकडील 60 बेडशिट गाडीमध्ये टाकून निघून गेले.
(नक्की वाचा- Helicopter Crashed in Pune : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू)
काही वेळाने पुन्हा येत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी बेडशिट विक्रेत्यांकडून 14 हजार रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर विक्रेत्यांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर त्यांनी 60 बेडशिटपैकी 37 बेडशिट परत दिले. 23 बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते.
(नक्की वाचा - हत्या की आत्महत्या? आई-वडील आणि दोन मुलांच्या मृत्यूने नागपूर हादरलं)
याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस स्टेशन यांना 18 सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून पोलीस उपायुक्त यांनी कारवाई केली आहे. वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.