म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वसामान्य या सदनिकांची माहिती घेऊ शकतात. याशिवाय अर्जाची नोंदणी कशी करायची याबाबतही साहाय्य केलं जाणार आहे.
नक्की वाचा - 2025 मध्ये मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या 8 तासात, शेवटच्या टप्प्याचं 100 टक्के काम पूर्ण
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी मोठ्या तत्वावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र बऱ्याचदा सर्वसामान्यांनी प्रकल्पांविषयी आणि अर्जाबाबत नेमकी माहिती नसते. त्यामुळे मंडळाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.2 ते 11 डिसेंबर 2024 या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज कसे करावे, यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असले यासंदर्भातील मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी 29 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
नक्की वाचा - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार घरांची लॉटरी निघणार, तारीख अन् किंमतही ठरली
म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील सदनिकांच्या ऑनलाइन विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला 11 ऑक्टोबर 2024 पासून प्रारंभ झाला आहे. वसई विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर या महानगरपालिकांच्या कार्यालयात सदर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच पालघर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांत व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातही मंडळातर्फे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. वसई, उल्हासनगर, पालघर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात सदर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महापे एमआयडीसी मधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयातही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विरार येथील जीवदानी देवी मंदिर, विरार चर्च, वसई चर्च या गर्दीच्या ठिकाणी तसेच विरार रेल्वे स्थानक, वसई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वाशी, पनवेल, डोंबिवली, कर्जत, कल्याण या रेल्वे स्थानकांवरही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश
या सर्व प्रकल्पांमध्ये 24 तास पाणीपुरवठा, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट व कॉमन पॅसेज आहेत. सर्व वसाहतीमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उपलब्ध आहे. या मोहिमेचा भाग म्हणून 10 रिक्षांमधून प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे.
स्टॉल्सवर काय असेल...
प्रत्येक स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी असेल. हा कर्मचारी योजनांची संपूर्ण माहिती, योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती, ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याबाबत माहिती व सहाय्य, अर्ज नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रांबद्दल माहिती देईल. अर्ज नोंदणी करतेवेळी येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरणही संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. सदर अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वयाकरिता म्हाडा कार्यालयात एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांचा तपशील
विरार बोळींज - १७४ (पीएमवाय)
विरार बोळींज - ४१६४
खोणी-कल्याण - २६२१
शिरढोण-कल्याण- ५७७४
गोठेघर-ठाणे- ७०१
भंडार्ली-ठाणे- ६१३
एकूण - १४,०४७
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world