Pune News : पुण्याच्या राजगड तालुक्यातील मढेघाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्या मोहोळांच्या मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. काल ४ जानेवारीच्या संध्याकाळी ही घटना घडली. यातील बहुतांशी विद्यार्थी 14 ते 17 वयोगटातील आहेत. यामध्ये ट्रेकर प्रशिक्षकांचा सुद्धा सहभाग आहे..
बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली..
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मढेघाट परिसरात पुण्यातील साहसी ट्रेकिंग करणाऱ्या एका क्लासच्या माध्यमातून आयोजित ट्रेकमध्ये सुमारे पन्नासहून अधिक विद्यार्थी घेऊन प्रशिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षक यांनी मढेघाट ते उपंडा अशा ट्रेकचं आयोजन केलं होतं. मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी गेल्यावर गर्द झाडीमध्ये झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्याने विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला.
मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने विद्यार्थी सैरभर झाली यामध्ये आठ ते दहा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले तर इतर 25 विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला. दरम्यान ट्रेकमध्ये असलेल्या एक जणांनी तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांच्याशी संपर्क साधला. यानंतर परिसरातील सोशल मीडियाच्या व्हाट्सअॅप ग्रुप वर सदर घटनेची माहिती पाठवली.
दोन विद्यार्थ्यांना पुणे येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी हलवले..
घटनेची गांभीर्य ओळखून केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे, यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कड्यामध्ये असलेल्या मुलांना वरती काढले आणि त्यानंतर स्वतःच्या वाहनासह 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून या विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षकांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. विद्यार्थ्यांना मळमळने, उलटी होणे, चक्कर येणे, तसेच चेहऱ्यावर, डोळ्यावर, ओठावर सूज येणे आणि आणि दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना अशी लक्षणे होती. या रुग्णांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. यानंतर अधिक जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुणे येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
