
राज्यात सेवा पंधरवड्यानिमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान इंटरनेट सेवा, वायफाय व विविध कार्यप्रणालीत कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर याद्वारे राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज' करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे निर्देशच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले आहेत. राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाने @75 ही संकल्पना घेऊन विविध लोकाभिमुख उपक्रम राबवावे, असे निर्देशही माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले आहेत.
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन - नैनुटिया, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे-पाटील तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेलार म्हणाले की, सध्याच्या नवीन पिढीला नवीन तंत्रज्ञानयुक्त प्लॅटफॉर्म सोबतच प्रशिक्षणही मिळायला पाहिजे. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने कार्यवाही करावी.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने फिल्मसिटीमध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान, कलाकारांसोबत चर्चा, आरोग्य केंद्र, दिव्यांग कलाकारांसोबत चर्चा, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबविण्यात यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारची शुभेच्छापत्रे तयार करणे. सांस्कृतिक कार्य विभागाने पुस्तक प्रकाशन, प्रदर्शन, चित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कला स्पर्धा, तमाशा कलावंतांशी चर्चा असे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम राबवावे. आजमितीस काही वाद्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असून ही वाद्ये जगासमोर प्रदर्शित करण्यासाठीही प्रयत्न करण्यात यावेत, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील 11 गडांना व जिंजी येथील किल्ल्याला युनेस्को वारसा नामांकन यादीत स्थान मिळाले असून या गडकिल्याचे आभासी वास्तव तसेच संवर्धित वास्तव तयार करण्यात यावे. राज्यातील 75 वारसा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जन्मस्थळ वडनगर येथील छायाचित्रांच्या कॉफी टेबल बुकचे मराठीत प्रकाशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीतील ठळक घटनांसंदर्भातील माहिती प्रदर्शन भरविण्याचे निर्देशही माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world