विनय म्हात्रे, ठाणे
ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे उमेदवार केदार दिघे व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विदेशी दारू आणि पैशांची पाकिटे वाटप केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी माल जप्त करत भारतीय न्यायसंहिता कलम 174 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री 1.45 ते 2 वाजेच्या दरम्यान अष्टविनायक चौकत पैसे आणि दारू वाटप करण्याचा प्रयत्न केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदीप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनित प्रभु, पांडुरगं दळवी, ब्रिद यांनी संगनमत करुन सचिन गोरीवले याच्या गाडीत दारू आणि प्रत्येकी 2000 रुपये भरलेली 26 पाकिटे ठेवून अष्टविनायक चौकात वाटण्यासाठी आले होते. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी वर्षा भोसले यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
"ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. काल रात्रीचा हा विषय आहे. मी ज्या गाडीत होतो ती गाडी पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासण्यासाठी अडवली होता. मी त्यांना विचारलं देखील सर्व क्लिअर आहे का? त्यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मला जाण्याची परवानगी दिली होती. मात्र आता असे आरोप केले जात आहे. त्यामुळे हे राजकीय षडयंत्र आहे", असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे.
"मी ज्या गाडीत होतो त्या गाडीत काहीही नव्हतं. मी सुरुवातीपासून सांगत होते इथे आचारसंहितेचं पालन होत नाहीय. त्याचा बळी मला करत आहेत का? ठाण्याची जनता सुज्ञ आहेत, दिघे आडनाव कधीही चुकीची गोष्ट करणार नाही याची खात्री आहे ", असंही केदार दिघे यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world