'लोहगड हत्या' प्रकरणानंतर लग्न जुळवण्याची पद्धतच बदलली? नव्या ट्रेंडची धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्रात लग्नाचा एक नवा ट्रेंड समोर आला आहे. लग्न जुळवण्यापूर्वी होणाऱ्या वधू किंवा वराची खाजगी गुप्तहेरांमार्फत पार्श्वभूमी तपासण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या तरुणाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने सिया गोयल हिने धक्का देऊन हत्या केल्याची घटना जून महिन्यात समोर आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील पालकांची आणि कुटुंबांची धास्ती वाढली आहे. आता लग्न ठरवण्यापूर्वी केवळ नातेवाईकांकडून चौकशी करणे, नोकरी पाहणे किंवा पत्रिका जुळवणे यावर कुटुंबे समाधान मानत नसून, थेट खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून होणाऱ्या वधू-वराची इत्यंभूत चौकशी करून घेतली जात आहे.

मुंबईतील आघाडीच्या डिटेक्टिव्ह एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत 'प्री-मॅरिटल बॅकग्राउंड चेक' (Premarital Background Checks) करण्यासाठी येणाऱ्या अर्जांमध्ये आणि चौकशीत मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

नेमकी काय माहिती काढत आहेत?

  • लपवलेले प्रेमसंबंध: पूर्वीचे प्रेमसंबंध, जुने मित्र किंवा सोशल मीडियावरील संशयास्पद व्यवहार.
  • आर्थिक कर्ज अन् कायदेशीर वाद: होणाऱ्या वरावर किंवा त्याच्या कुटुंबावर असलेले मोठे कर्ज, व्यावसायिक फसवणूक किंवा न्यायालयात सुरू असलेले खटले.
  • शिक्षण आणि नोकरीचे दावे: बायोडाटामध्ये दिलेल्या शिक्षण आणि पगाराच्या दाव्यांची सत्यता.
  • व्यसने आणि पूर्वइतिहास: मद्यपान, जुगार किंवा इतर कोणतीही गंभीर व्यसने आहेत का, याची गुप्तपणे माहिती घेणे.

(नक्की वाचा-  Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)

लहान कारणांवरून लग्न मोडण्याच्या घटना

एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासणीमुळे अनेक लग्नांचे प्रस्ताव पुढे जाण्यापूर्वीच रद्द होत आहेत.  एका प्रकरणात, तरुणीचे पूर्वीच्या कॉलेज मित्रासोबत फक्त साधे संभाषण सुरू असल्याचे समजताच मुलाच्या घरच्यांनी साखरपुडा मोडला. मुंबईतील एका प्रकरणात मुलाने त्याच्यावरील मोठे कर्ज आणि सुरू असलेले कायदेशीर वाद लपवल्याचे गुप्तहेरांच्या तपासात उघड झाल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी विवाह नाकारला. 

जूनमधील आणखी एका घटनेत, होणारा नवरा एका महिला सहकाऱ्यासोबत नियमितपणे पूल कॅबने कामावर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर, अयोग्य संबंधांचा कोणताही पुरावा नसतानाही, एका गुजराती कुटुंबाने लग्नसंबंधातून माघार घेतल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या एका प्रकरणात, होणाऱ्या वधूच्या शैक्षणिक पात्रतेत आणि नोकरीच्या इतिहासात विसंगती आढळून आल्यानंतर वराच्या कुटुंबाने माघार घेतली.

(नक्की वाचा-  Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास होणार स्वस्त आणि मस्त; 'भारत टॅक्सी'मुळे बदलणार चित्र, पाहा दर)

ऑनलाईन मॅट्रिमोनियल आणि डेटिंग ॲप्समुळे अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढला आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी पालक अधिक सतर्क झाले आहेत.

कायदेशीर चौकट अन् पोलिसांचा इशारा

माजी आयपीएस अधिकारी आणि वकील वाय. पी. सिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे की, कायदेशीर आणि सुरक्षित मार्गाने सार्वजनिक नोंदी तपासणे हा गुन्हा नाही. खाजगी गुप्तहेरांद्वारे सामान्य माहितीची शहानिशा करणे किंवा विचारपूस करणे गुन्हा ठरत नाही. मात्र, कोणाचा बेकायदेशीर पाठलाग करणे, खाजगी कॉल डिटेल्स, मेसेजेस किंवा ईमेल हॅक करणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे.
 


Topics mentioned in this article