Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. अजित पवार हे सकाळी 8.10 च्या सुमारास मुंबईहून निघाले होते आणि ते बारामतीमध्ये 8.50 ला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र बारामतीजवळ विमान येताच त्यांच्या विमानाला अपघात झाला ज्यात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला.
अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात आले आहे. इथं त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. जनसागर जणू बारामतीत लोटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Ajit Pawar Accident: बारामतीत अजित पवार अमर रहेच्या घोषणा
अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. अजित पवार अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. यावेळी बारामतीच्या रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. अजित पवारांच्या पार्थिवासोबत जय पवार दिसत होते. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झाले आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातही मोठी गर्दी झाली आहे. बारामती रुग्णालयातून त्यांचे पार्थिव रुग्णवाहीकेतून नेण्यात आले. यावेळी मोठी सुरक्ष व्यवस्था ठेवण्यात आली होती.
Ajit Pawar Accident: अजित पवारांच्या निधनाबाबात शरद पवारांची मोठी प्रतिक्रीया
अजित पवारांच्या निधनाबाबत शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. हा कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. झालेलं नुकसान कधीही भरून निघणारं नाही. हे कोणाच्या हातात नव्हतं. हा एक निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही असं सांगत शरद पवारांना आपले अश्रू अनावर झाले.
Ajit Pawar Death News: भारतीय हवाई दलाने पथक बारामतीत
राज्य सरकारच्या तातडीच्या विनंतीनंतर भारतीय हवाई दलाने (IAF) बारामती विमानतळावर आपले पथक तैनात केले आहे. लोहगाव हवाई दल केंद्रातून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कर्मचाऱ्यांसह आवश्यक तांत्रिक उपकरणे तातडीने रवाना करण्यात आली. सुरक्षित विमान वाहतुकीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.हवाई दलाच्या या पथकाने बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर अत्यंत वेगाने आपत्कालीन एटीसी सेवा सुरू केल्या आहेत.
Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल रमेश चेन्निथला यांचा शोकसंदेश
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या निधनाने माझे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
"एनएसयूआय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीपासूनच माझे अजित पवारांशी जवळचे नाते होते. नंतर, जेव्हा मी अखिल भारतीय युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, तेव्हा मी त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी तेच नाते कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाल्यानंतरही हे प्रेमाचे नाते कायम राहिले."
महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभारी म्हणून काम करताना मला त्यांच्याशी अधिक जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने मराठा राजकारणातील एक महान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कुटुंबाला हा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती मिळावी अशी मी प्रार्थना करतो,” असे रमेश चेन्निथला यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Ajit Pawar Death News: छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रीया
अपघाताचे ठिकाण पाहिल्यानंतर धावपट्टी चांगली मोठी होती. पण धावपट्टी राहीली एकीकडे आणि विमान दुसरीकडे गेले. विमानतळाच्या भिंतीला विमान धडकल्याचं दिसत आहे. त्यामुळे स्फोट झाला. विमानाचे येवढे तुकडे झाले आहेत तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पना करू शकत नाही असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले. एक चक्कर मारून विमान गेले होते. त्यानंतर ते विमान अपघातग्रस्त झाले. याचं आश्चर्य वाटतय. दुर्दैवी घटना आहे. चौकशी केली तरी काय सापडणार आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
Ajit Pawar Death News: अजित पवारांच्या जाण्याने समाजाचे नुकसान झाले- मनोज जरांगे पाटील
अजितदादा गेले यावर विश्वास बसत नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अजित पवारांच्या मृत्यूने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे असं ही जरांगे पाटील म्हणाले.
Ajit Pawar Death News: विद्या प्रतिष्ठान बाहेर प्रचंड गर्दी
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आहेत. कार्यकर्त्याचा जनसागर इथं लोटला आहे. अंत्यदर्शनासाठी इथं मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहे. विद्या प्रतिष्ठानचे मैदान गर्दीनो ओसंडून वाहात आहे.
Ajit Pawar Death News: पवार परिवार विद्या प्रतिष्ठान येथे पोहचले
पवार परिवार विद्या प्रतिष्ठान येथे पोहचले आहे. तिथं बारामती स्थानिक लोक भेटण्यास येत आहेत. पण कुणाला आत जावून दिले जात नाही. त्यामुळे पोलिस आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद होत आहे.
Ajit Pawar Death News: छगन भुजबळांनी अपघात स्थळाला दिली भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांचे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी त्या जागेची पाहाणी केली. यावेळी बोलताना रन-वे ही मोठा होता.तरी ही हे विमान कसे कोसळले याची विचारणा केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना अपघाताची माहिती दिली. शिवाय अजित पवार ज्या सीटवर बसले होते त्या सीटसह कसे बाहेर फेकले गेले याची माहिती दिली. पाहाणी करून छगन भुजबळ हे अजित पवाराच्या बारामतीतल्या घराकडे गेले.
Ajit Pawar Death News:अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाळी निधनाने संपूर्ण राज्यसह पिंपरी चिंचवड शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात व्यापारी वर्गानं कडकडीत बंद ठेवलं आहे. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचा एक 'शब्दाला पक्का' नेता हरपला, खासदार अनिल बोंडे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.. प्रशासकीय कामाचा उरका आणि गोरगरीब जनतेच्या विकासाची ओढ असलेला हा नेता आज आपल्यात नाही, हे मनाला पटत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी अजित पवारांना आदरांजली अर्पण केली आहे.
Ajit Pawar Death News: जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांना अश्रू अनावर, कार्यकर्तेही गहिवरले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांना अश्रू अनावर झालेले पहायला मिळाले. तर जुन्नर मधील इतर कार्यकर्तेही भावनाविवश झालेले पहायला मिळाले.
Ajit Pawar Death News दुर्घटनाग्रस्त विमान प्रकरणात तपासाला वेग
एअरक्राफ्ट ॲक्सीडेंट इन्विस्टीगेशन ब्युरो च्या अधिकाऱ्यांनी VRS व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली. कंपनीचे मालक आणि AAIB चे अधिकारी तब्बल दीड तासांहून अधिक वेळ कंपनीच्या आत उपस्थित. चौकशी पूर्ण करून AAIB चे अधिकारी कंपनीबाहेर आले असून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेऊन सील करण्यात आली आहेत. या चौकशीसाठी तीनहून अधिक अधिकारी VRS व्हेंचर्स कंपनीत पोहोचले होते.
दरम्यान, VRS व्हेंचर्सचे संचालक व्ही. के. सिंह म्हणाले, “पायलटला कदाचित रनवे स्पष्टपणे दिसला नसावा. पायलटकडे १६ हजार तासांचा उड्डाण अनुभव होता, तर को-पायलटकडे १,५०० तासांचा अनुभव होता. विमानात कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हता. २०२३ मधील अपघाताच्या वेळी पाऊस सुरू होता. एअरलाईनकडे अजूनही ७ विमाने आहेत आणि ती ग्राउंड करण्याचा आमचा निर्णय नाही. DGCA आमच्या विमानांची तपासणी करत आहे.”
Ajit Pawar Death News: अजीत पवारांच्या अकस्मात निधनाने हितेंद्र ठाकूर यांना ही आपले अश्रू अनावर
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अकस्मात निधनाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना ही आपले अश्रू अनावर झाले. दाटलेल्या कंठाने हितेंद्र ठाकूरांनी दिला दादांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा म्हणजे दादा. आमच्या ठाकूर कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे घरचे सबंध होते अस त्यांनी यावेळी सांगितले.
Ajit Pawar Death News: डोळ्यांनी पाहिलं तरी मन काय विश्वास ठेवत नाही- अनिल गोटे
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी म्हणून अजित पवार यांची ओळख होती. आज सकाळी मीडियाच्या माध्यमातून बातमी पाहिली मात्र डोळ्यांनी जरी पाहिले असलं तरी मन काही विश्वास ठेवत नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर तितकेच लोकप्रिय असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. हे खरच विश्वास न बसणारी गोष्ट आहे. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि अधिकाऱ्यांवर असलेली पकड या गोष्टी चिरकाल लक्षात राहतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली.
Ajit Pawar Death News: अजित पवारांच्या काठेवाडीच्या घराबाहेर मोठी गर्दी
अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानाबाहेर महिलांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. काटेवाडी ग्रामस्थ अजित पवारांच्या निवास्थानाबाहेर आणि शेता जवळच मोठ्या प्रमाणात जमले आहे. अनेकांना अश्रू अनावर झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
Ajit Pawar Death News: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बारामतीकडे रवाना
अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे बारामतीकडे रवाना झाले आहेत.
Ajit Pawar Death News: अजित पवारांवर उद्या 11 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार
Ajit Pawar Death News: अजित पवारांवर उद्या ११ वाजता शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणार अंत्यसंस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत. विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कारासाठी अजित पवारांचा पार्थिव ठेवण्यात येणार आहेत.
Ajit Pawar Death News: PM नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून केली विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून विचारपूस केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
Ajit Pawar Death: समाजाची फार मोठी हानी झाली, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना अश्रू अनावर
Ajit Pawar Death: समाजाची फार मोठी हानी झाली, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना अश्रू अनावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधनानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांच्या डोळ्यात बोलताना अश्रू दाटून आले. अजित पवारांचे जे दुर्दैवी निधन झाले हे शब्दांनी सांगता येत नाही. समाजाची फार मोठी हानी झाली आहे, अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या आहे.
Ajit Pawar Plane Crash Live: खंबीर नेता, उमदा सहकारी गमावला!- उद्धव ठाकरे
खंबीर नेता, उमदा सहकारी गमावला!- उद्धव ठाकरे
‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
Ajit Pawar Plane Crash Live: महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज गमावला- सचिन तेंडुलकर
महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज गमावला- सचिन तेंडुलकर
अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽 Very sad to learn about the untimely demise of…
Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार होणार
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार होणार आहेत. पवार कुटुंबीय हळूहळू बारामतीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. शरद पवार काही वेळापूर्वीच बारामतीत दाखल झाले आहेत.
Ajit Pawar Live Update: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला- राज ठाकरे
राज ठाकरे
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
Ajit Pawar Death LIVE Update: महाराष्ट्राने उमदा नेता गमावला: राज ठाकरे
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी… pic.twitter.com/yIjUC255Af
Ajit Pawar Death LIVE Update: अजित पवारांचे अंत्यसंस्कार काटेवाडीत व्हावे.. ग्रामस्थांची मागणी
पवार कुटुंबाचे मूळ गाव असणाऱ्या काठेवाडी गावात शोक काळा पसरली. काटेवाडी गावचा बाप माणूस हरपला अशी भावना ग्रामस्थांची दिसून येते. ज्या काठेवाडीत अजितदादांचे बालपण गेले. त्याच काटेवाडी त्यांना शेवटचा निरोप द्यावा. त्यांचे अंत्यसंस्कार काटेवाडी च्या मातीतच व्हावे. अशी इच्छा काटेवाडी ग्रामस्थांची आहे.
Ajit Pawar Death LIVE: 'माझा मोठा भाऊ गेला..' अजित पवार
अजित पवार यांचे जाणे अत्यंत दुःखद घटना आहे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झालीय.अत्यंत सामाजिक जाण असणारा शिस्तबद्ध असं नेता.काम करताना सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करणारा आणि शेतकरी कुटुंबाशी नाळ जोडणारा रोखठोक नेतृत्व अशीi त्यांची वेगळी ओळख होतो, माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी साथ दिली.
एका मोठ्या भावाची भूमिका त्यांनी माझ्या बाबत राबवली. दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात म्हणून मी त्यांना सातत्याने बोलून प्रयन्त करत होतो. माझी आणि त्यांची शेवटची भेट कृषी प्रदर्शनाच्या दरम्यान झाली त्यांनी प्रत्येक स्टोल मध्ये घेऊन जाऊन त्यांनी मला प्रदर्शन दाखवलं जवळच घट्ट अस नात त्यांचं आणि माझं होत.राष्ट्रवादी कधीच भरून न निघणारे नुकसान दादाच्या जाण्याने झालाय. त्यांच्या जाण्याने तीव्र आणि दुखतं भावना आमच्या कुटूंबियांना झालाय.या दुःखद पवार कुटूंबियांना झालेले हे दुःख सावरण्याची शक्ती त्यांना देऊन अस दुःख माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
Ajit Pawar Death Updates: अजितदादांचं जाणं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धक्का देणारे: जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा यांच्या अकाली जाण्याने सबंध महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक निडर आणि साहसी व्यक्तिमत्व म्हणून मी अजित दादा यांचे वर्णन करीन. अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या तालमीत तयार झालेले व्यक्तिमत्त्व! त्यामुळेच सत्ता ही लोकांसाठी आहे, याचे भान असलेले नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार !!
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे बोट धरून ते राजकारणात आले, हे खरे, पण त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ओळख तयार केली, ती स्वतःच्या कर्तबगारीने! अजितदादा यांचा प्रशासनावर दरारा असला तरी त्यांची दहशत नव्हती. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना आदरयुक्त भिती वाटत होती.
कोणतीही व्यक्ती ही काळाचे अपत्य असते. मात्र, अजित पवार हे काळाचे नेते होते. काळाच्या मर्यादा त्यांनाही होत्या. तरीही ते लोकनेते होते. मोजका आहार, उत्तम व्यायाम आणि भल्या पहाटे कामाला सुरूवात असे शिस्तबद्ध आयुष्य ते जगले.
कार्यकर्त्यासाठी धावून जाणारे अजितदादा मला अधिक भावले होते. एका खोट्या गुन्ह्यात मला अडकवल्यानंतर विमनस्क अवस्थेत राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयाप्रत मी आलेलो असताना माझ्या समर्थनार्थ सर्वात आधी धावून येणारे अजितदादाच होते.
त्यांचे असे अकाली जाणे मनाला प्रचंड वेदना देणारे तर आहेच; पण, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धक्का देणारे आहे.
Ajit Pawar Death Update: आमच्या आयुष्यातील आज सर्वात वाईट दिवस- जयंत पाटील
जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले.
महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील.
राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम…
Ajit Pawar Death Update: अजितदादांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे- CM देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
"अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आण दिलदार मित्र सोडून गेला आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान,गृहमंत्री यांच्याी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे. त्यांनीही प्रचंड दुख व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळ हळहळ पसरली आहे. पुढील गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील."
राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर- मुख्यमंत्री
"संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे."
"अजितदादांचं जाणं हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Ajit Pawar Plane Crash Live: मोठा भाऊ गेल्याची भावना, एकनाथ शिंदे यांची भावुक प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
"अजित पवारांच्या निधनाची बातमी वेदना आणि मनाला चटका लावणारी आहे. अजितदादा आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. परखड, स्पष्टवक्ते मात्र मनाने अतिशय निर्मळ अशा स्वभावाचे ते होते. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री होते. लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा त्यांनी आर्थिक तरतूद उत्तमरित्या केली," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
"एकदा करायचं ठरवलं की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. आम्ही टीम म्हणून काम केले. अजितदादा पहाटे लवकर काम सुरु करायचे. सकाळी ६ वाजता देखील त्यांनी वेळ दिलेलं अनेकांनी पाहिलं आहे. काल-परवाच आमची भेट झाली होती. सकाळी ही घटना कळली तेव्हा काल-परवाच्या आठवणी समोर येऊ लागल्या. माझ्यापेक्षा राजकारणात आणि वयाने ते मोठे होते. राज्यातील अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. राज्याला त्याचा फायदा होत होता", असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
"मंत्रिमंडळात एखादा विषय आला की त्याबद्दल निर्भिडपणे सांगणारे ते नेते होते. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांचंच नाहीतर राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. आज मोठा भाऊ गेल्याची भावना आणि दु:ख मला वाटतंय. पवार कुटुंबीयांसाठी हे डोंगरावर दु:ख आहे. हे दु:ख पचवण्याची त्यांचा ईश्वर शक्ती देवो."
Ajit Pawar Death Live: अजितदादा कडक शिस्तीचे, मात्र मनाने प्रचंड हळवे होते- संजय शिरसाट
संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गट
वेळेचे महत्त्व अजित पवारांनी ओळखले होते. कडक शिस्तीचे होते मात्र मनाने ते प्रचंड हळवे होते. त्यांनी संकटे आल्यानंतर एकट्याने तो केला. अनेकवेळा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, मात्र दादांनी त्याची पर्वा केली नाही.
Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार यांचे अकाली निधन कधीही भरून न येणारे नुकसान- राष्ट्रपती
द्रोपदी मुर्मू, राष्ट्रपती
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त करत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांनाही देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
महाराष्ट्र के बारामती में एक विमान दुर्घटना में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, श्री अजित पवार समेत कई लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है। अजित पवार जी का असामयिक निधन एक अपूरणीय क्षति है। उन्हें महाराष्ट्र के विकास में, विशेषकर सहकारी क्षेत्र में, विशेष योगदान के लिए सदैव…
Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार जनतेचे नेते होते- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नरेंद् मोदी, पंतप्रधान
अजित पवार जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात अग्रेसर होते. एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचित लोकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना.
Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and… pic.twitter.com/mdgwwGzw4R
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं : नितीन गडकरी
"अजित पवार माझे घनिष्ठ मित्र होते. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. उत्तम प्रशासक आणि विकासाची दूरदृष्टी असलेले ते नेते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. पवार कुटुंबियावर हा मोठा आघात आहे. माझ्या या सहकाऱ्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, नितीन गडकरी यांची भावनिक प्रतिक्रिया
Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांचं माझ्यावर कायम प्रेम होतं- निलेश लंके
Ajit Pawar Death Update: महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भेटलो होतो, ती भेट शेवटची होती. आमदार असताना मी अजित पवारांच्या अत्यंत जवळचा होतो. त्यांचे प्रेम माझ्यावर कायम होतं- निलेश लंके, खासदार
"डोकं खूप सुन्न झालं ऐकून", अंजली दमानिया यांचं भावुक ट्वीट
डोकं खूप खूप सुन्न झाला ऐकून ! विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते सुरूच ठेवलं असतं. पण हे… हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे…… खूप
Ajit Pawar Plane Crash Live: CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द केले आहेत. एकनाथ शिंदे थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होणार आहेत.
Ajit Pawar Plane Crash Live: मी आज खुप दु:खी आहे: अरविंद सावंत
मी आज खुप दु:खी आहे. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्षावर मोठा घाव आहे. बारामतीच्या प्रगतीमध्ये अजित पवारांचं मोठं योगदान होतं. पवार कुटुंबियांच्या दुखात मी सामील आहे, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची भावनिक प्रतिक्रिया
Ajit Pawar Plane Crash Live: दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक नेते दाखल
दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक नेते दाखल झाले आहेत. आमदार रोहित पवार देखील बारामतीसाठी रवाना झाले. -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात घातपात असू शकतो. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी केली आहे.